
>> शब्दांकन ः राज चिंचणकर
मराठी रंगभूमीवर तब्बल पाच दशके कार्यरत असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मोहन साटम जागवत आहेत एक हृद्य आठवण…
रंगभूमीवर मी पहिले पाऊल टाकले ते 15 ऑगस्ट 1972 या दिवशी. आज त्याला 51 वर्षे होऊन गेली आहेत. कामगार कल्याण केंद्र, महानगरपालिका, राज्य नाटय़स्पर्धा अशा विविध नाटय़स्पर्धांमध्येही त्यावेळी मी भाग घेत होतो. माझे पहिले व्यावसायिक नाटक म्हणजे ‘बेबंदशाही.’ ताराचंद्र थिएटर्स, जयमंगल, साहित्य संघ, उमा-महेश, सहकारी मनोरंजन मंडळ अशा पाच संस्था त्याकाळी ‘बेबंदशाही’ हे नाटक करत होत्या आणि या पाचही संस्थांच्या माध्यमातून मी नाटकात विविध अशा दहा भूमिका केल्या. या नाटकाचे शेकडो प्रयोग झाल्यानंतर जयमंगल या संस्थेच्या ‘नटसम्राट’ या नाटकात विठोबाची भूमिका करण्याची संधी मला मिळाली. या नाटकाचेही जयमंगल, रंगमंच मुंबई आणि अर्चना थिएटर या तीन संस्थांतर्फे शेकडो प्रयोग आम्ही केले.
‘ती फुलराणी’, ‘गांधी विरुद्ध गांधी’, ‘तो मी नव्हेच’, ‘जावई माझा भला’, ‘सरगम’, ‘वा गुरू’, ‘बेइमान’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘अभिनेत्री’, ‘इथे ओशाळला मृत्यू’ अशा अनेक नाटकांत मी त्यानंतर भूमिका रंगवल्या. पण माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा अजून बाकी होता, हे मला तेव्हा माहीत नव्हते. रंगमंच मुंबई या संस्थेच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात मी हंबीरराव ही भूमिका साकारली. विशेष म्हणजे या नाटकाचे दोन प्रयोग आम्ही प्रत्यक्ष रायगडावर केले. या नाटकानंतर याच संस्थेच्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकात मधुसूदन तोरडमल म्हणजेच मामांनी गाजवलेली ‘बारटक्के’ ही भूमिका करण्याची मला संधी मिळाली. हे तर माझे परमभाग्यच होते. या नाटकाचा संयुक्त पाच हजारावा प्रयोग 5 ऑक्टोबर 2014 रोजी श्री शिवाजी मंदिर येथे प्रत्यक्ष मामा तोरडमल यांच्या उपस्थितीत मला करता आला.
या प्रयोगानिमित्त ‘तुर्क 5000 ः एक हास्ययात्रा’ अशी एक स्मरणिका काढण्यात आली होती. त्यानिमित्त मामांची मुलाखत घेण्याच्या ओघात मी मामांना विचारले होते, ‘‘तुम्हाला ‘बारटक्के’ ही भूमिका कशी सुचली?’’ तेव्हा त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘‘एकदा मी गावाला गेलो होतो. तेव्हा माझ्या मोठय़ा बंधूंसोबत जमिनीच्या कामानिमित्त तलाठय़ाला भेटायला गेलो होतो. तेव्हा तलाठय़ाने सगळे ऐकून घेतल्यावर तो माझ्या बंधूंना म्हणाला की, तुम्ही काहीही ‘ही’ (काळजी) करू नका. तुमच्या ‘ही’चा (जमिनीचा) मी ‘हा’ (सातबारा) काढून बघतो. त्या ‘याच्यावर’ (सातबारावर) तुमची ‘ही’ (नावे) असली, तर तुमचे ‘हे’ (काम) झालेच म्हणून समजा.’’
तर ‘तरुण तुर्क’मधली ‘बारटक्के’ ही भूमिका उपेंद्र दाते यांनी माझ्याकडून खूपच चांगली करून घेतली होती. त्यासाठी नुसता घामच नाही, तर रक्त आटवले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. एकदा ठाण्याच्या आमच्या प्रयोगाला भिवंडीहून एक गृहस्थ आले होते. नाटक संपल्यावर मला ते म्हणाले, ‘‘मी मामांचे काम पाहिले होते. ते बारटक्के उत्तमच करायचे, पण तुमचे काम पाहताना तुम्ही कुठेही कमी पडला नाहीत. त्यांच्याइतकेच उत्तम काम तुम्ही केलेत.’’ बारटक्केच्या भूमिकेसाठी या आणि अशा मिळालेल्या अनेक प्रतिक्रिया माझ्यासाठी मोलाच्या ठरल्या.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 36 वर्षे नोकरी करून मी रंगभूमीवरही काम करत राहिलो. माझी ‘बारटक्के’ची भूमिका आमच्या महानगरपालिकेचे उपायुक्त विजयसिंह पाटणकर यांनी पाहिली होती. गेल्या 2 मार्चला माटुंग्याच्या अखिल भारतीय महिला मंडळात मिसेस पाटणकर यांनी माझ्या दोन एकांकिका ठेवल्या होत्या. महिला मंडळाच्या या कार्यक्रमाला श्रीयुत पाटणकरही उपस्थित होते. एकांकिका छानच झाल्या, पण एकांकिका संपल्यावर पाटणकर यांनी आवाहन केले की, ‘‘आम्हाला तुमचा बारटक्के बघायचा आहे. तेव्हा ‘तरुण तुर्क’मधला एखादा प्रसंग आम्हाला करून दाखवा.’’ मग मी त्या नाटकातला कव्हरचा गुलाबाचा प्रसंग केल्यावर उपस्थित महिला मंडळाने उत्स्फूर्तपणे टाळय़ांचा कडकडाट केला. ‘बेबंदशाही’ या नाटकापासून सध्या सुरू असलेल्या ‘संज्या छाया’ या नाटकापर्यंत एकूण 27 व्यावसायिक नाटकांचे सुमारे पाच हजार प्रयोग मी केले. अजूनही मी रंगभूमीवर कार्यरत आहे, याचे समाधान आहे. माझ्यासाठी माझ्या भूमिका म्हणजे आनंदाचा ठेवा आहेत.

























































