जागर – लगीनघाई नकोच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. ऋतू सारस्वत

हिमाचल प्रदेश सरकारने महिलांसाठी विवाहाचे किमान वय 18वरून 21 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर वाद निर्माण होणे स्वाभाविक आहे. कारण गेल्या सप्टेंबर महिन्यात कायदा आयोगाने आपल्या अहवालात विवाहाचे किमान वय 18 वरून 16 वर्षे करणे योग्य नसल्याचे मत मांडले होते. तसे केल्यास बालविवाह आणि मुलांची तस्करी रोखण्यासाठी होणाऱया प्रयत्नांनाही धक्का बसेल, असे नमूद केले. हिमाचल सरकारचा निर्णय कायदा आयोगाशी सुसंगत आहे. यासाठी मुलींच्या विवाहाचे वय कमी करण्याने होणारे धोके जाणून घ्यायला हवेत.

आजच्या डिजिटल युगातही ग्रामीण भागात बहुतांश पालक मुलगी 18 वर्षांची होण्याची वाट पाहतात आणि ती 18 वर्षांची झाली की, लगेच तिचा विवाह करतात. विशेष म्हणजे या वयात मुलींचे शिक्षणही पूर्ण होत नाही. त्यामुळे विवाहाची वयोमर्यादा वाढविल्यास पालकांना तिच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देता येईल.

हिमाचल प्रदेश सरकारने महिलांसाठी विवाहाचे किमान वय 18वरून 21 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लागू करण्यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. आपल्या देशात विवाहाचे किमान वय किती असावे, यावर वेळोवेळी चर्चा झाली आहे. हिमाचल प्रदेश सरकारच्या निर्णयानंतर वाद निर्माण होणे स्वाभाविक आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात कायदा आयोगाने आपल्या अहवालात विवाहाचे किमान वय 18 वरून 16 वर्षे करणे योग्य नसल्याचे मत मांडले होते. अशी कृती केली तर त्यामुळे अनेक नुकसान होण्याचा इशारा दिला, तसेच बालविवाह आणि मुलांची तस्करी रोखण्यासाठी होणाऱया प्रयत्नांनाही धक्का बसेल, असे नमूद केले. शिवाय मुलांचे लैंगिक शोषण रोखणारा पोक्सो कायदादेखील कमकुवत होईल, असेही नमूद केले. 16 वर्षांचे किमान वय निश्चितीबाबत मांडलेल्या तर्कानुसार आजच्या घडीला मुले आणि मुली या वयात शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा परिपक्व होत असून त्यांना लैंगिक संबंधाची माहिती कळत असल्याचे म्हटले आहे. 14,15 आणि 16 वर्षांची मुले आणि मुली हे पती आणि पत्नीप्रमाणे राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे न्यायालयासमोर येतात. मात्र हा तर्क दोषपूर्ण आहे. परिपक्वतेचे अनेक अर्थ निघतात. परिपक्वतेचा अर्थ हा चांगले आणि वाईट या स्थितीत निर्णय घेण्याची क्षमता असणे. सोळा वर्षांच्या मुलामुलींत अशा प्रकारची परिपक्वता विकसित होतेच, असे आपण म्हणू शकत नाही. केवळ लैंगिक  संबंधाचे आकलन असल्याने एखाद्याला संपूर्णपणे परिपक्व म्हणणे चुकीचे आहे. किमान वय 21 वर्षांचा विचार केला तर चर्चेत अनेक ठिकाणी हा विषय केंद्रस्थानी राहिला आहे. महिलांना जोडीदार निवडताना मानसिकपेक्षा शारीरिकदृष्टय़ा परिपक्व असणे गरजेचे असते. गर्भधारणा, बाळंतपण तसेच बाळ जन्मल्यानंतर पोषण उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्यदायी शरीराची गरज भासते.

हिमाचल सरकारच्या निर्णयाला विरोध होऊ शकतो. मात्र असा विरोध आपल्याला नवीन नाही. 1954 च्या अगोदर मुलींच्या विवाहाचे किमान वय 14 होते आणि त्यानंतर 18 वर्षे करण्यात आले. छुप्या मार्गाने होणाऱया बालविवाहाला सोडून द्या, परंतु किमान वयाची मर्यादा वाढविल्याने शिशू मृत्युदर हा 1951 मध्ये हजारामागे 116 होता, तो 2019-21 या काळात 35 वर आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 15 ते 19 वयोगटातील मुलगी आई होते तेव्हा गर्भाशयात संसर्ग, उच्च रक्तदाब यासारखी जोखीम वाढते आणि 20 ते 24 वयोगटातील मुलगी आई झाल्यास तिचे आणि बाळ, दोघांचेही आरोग्य चांगले राहते.

विवाह किमान 21 व्या वर्षी होत असेल तर मुलींच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम पडेल. आजही देशात प्रामुख्याने ग्रामीण भागात पालक हे आपल्या मुलीचे वय 18 वर्षे होताच विवाह करतात. या वयापर्यंत त्यांचे महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण झालेले नसते. विवाहाचे किमान वय वाढविल्यास पालक त्यांच्या शिक्षणावर अधिक लक्ष देतील. ज्या मुली महाविद्यालयाच्या पातळीवरचे शिक्षण मिळवतात, त्या अपेक्षापेक्षा अधिक परिपक्व होतात आणि हक्काबाबत अधिक जागरूक राहतात. या स्थितीत संपूर्ण हिंदुस्थानी समाजावर चांगला परिणाम होईल. ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्च ऑन वुमन’ तसेच जागतिक बँकेच्या अहवालानुसार किशोरावस्थेत विवाह केल्यास शिक्षणात अडथळे येतात आणि परिणामी अर्थार्जनात सरासरी नऊ टक्के घट होऊ शकते. त्याचा कुटुंब आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम पडतो.

जागतिक बँकेच्या तर्कानुसार एखाद्या मुलीने 12 वर्षांपर्यंत दर्जेदार शिक्षण मिळवले तर जागतिक अर्थव्यवस्थेतील उत्पन्न हे 30 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढू शकते. किशोरावस्थेत विवाह केल्याने कोणत्याही देशातील जीडीपीला किमान 1.7 टक्के नुकसान सहन करावे लागते. त्यामुळेच ही बाब केवळ मुलीच्या हक्कापुरतीच मर्यादित नाही, तर तरुण पिढी तयार करण्याचा मुद्दा असून तो आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित आहे. शरीर चांगले असेल तर मन आणि मेंदू हेदेखील चांगले राहील. अशा वेळी किशोरावस्थेत विवाह होणे आणि प्रसूती यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सज्ञान वयात एखादी महिला बाळाला जन्म देत असेल तर ती चांगल्या रीतीने त्याचा सांभाळ करू शकते, चांगले जीवन प्रदान करू शकते. दुसरीकडे लहान मुलगी आपल्या आयुष्याला चांगला आकार देऊ शकत नसेल तर ती बाळाला कशी सांभाळू शकेल? म्हणूनच विवाहाचे किमान वय वाढविण्याबाबत देशात गांभीर्याने विचार होईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे.

(लेखिका समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)