
देशात आजघडीला सरकारी विभागात 30 लाख पदे खाली आहेत. पंतप्रधान मोदी नोकऱया देत नाहीत. कारण यात आरक्षणातून एससी, एसटी आणि ओबीसीच्या लोकांना नोकऱया मिळतील. निवडणुकीपूर्वी मोदी यांची घोषणा होती, सबका साथ सबका विकास, परंतु त्यांनी सर्वांचा सत्यानाश केला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार टीका केली. संविधानाच्या लढाईत तुम्ही जर काँग्रेसला साथ दिली नाही तर तुम्हाला मोदींचे गुलाम व्हावे लागले, असा गंभीर इशाराही खरगे यांनी बोलताना दिला.
मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीतील रामलीला मैदानातून न्याय संकल्प संमेलनाअंतर्गत काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीआधी उत्तराखंड आणि ओडिशानंतर हे तिसरे कार्यकर्ता संमेलन आहे. गेल्या 21 दिवसांपासून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. या यात्रेत राहुल गांधी न्यायाचे 5 स्तंभ घेऊन चालले आहेत. ते जनतेच्या हक्कासाठी लढत आहेत. ही लढाई संविधानाच्या संरक्षणासाठी आहे. या लढाईत जर तुम्ही काँग्रेसला साथ दिली नाही तर तुम्ही मोदींचे गुलाम व्हायला वेळ लागणार नाही, असे खरगे म्हणाले. निवडणुकीपूर्वी मोदी यांनी 2 कोटी नोकऱया, लोकांच्या खात्यात 15-15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पंतप्रधान मोदींनी केवळ तरुणांना, महिलांना, शेतकऱयांना आणि गरीबांना धोका देण्याचे काम केले आहे, असेही खरगे या वेळी म्हणाले.

























































