
उत्तराखंड विधानसभेत समान नागरिक विधेयक सादर करण्यात आलं आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातील सर्व नागरिकांना एकच कायदा लागू होईल. पण, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने या कायद्याला विरोध केला आहे.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांनी या कायद्याला विरोध केला असून हा कायदा चुकीचा आहे. मुस्लिमांसाठी 1937चा शरियत कायदा लागू आहे. त्याशिवाय हिंदूंसाठी हिंदू विवाह कायदा, वारसा हक्क कायदा, हिंदू दत्तक विधान असे कायदे आहेत. त्याआधारे सर्वांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे आणि नागरी कायद्यांर्गत नियम बनवण्याचा अधिकार आहे. पण, आम्ही मानतो की सगळ्या कायद्यांमध्ये एकसमानता आणता येणार नाही. जर एखाद्या समाजाला तुम्ही कायद्याच्या चौकटीबाहेर ठेवता तेव्हा त्याला समान नागरी संहिता म्हणता येणार नाही, असं महली म्हणाले आहेत.
संविधानाच्या मूलभूत अधिकारांपैकी एक अधिकार हा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामुळे समान नागरी कायद्याची गरज नाही. विधानसभेत विधेयक सादर केलं गेलं असेल तर आमचे कायदेतज्ज्ञ त्याचा अभ्यास करेल आणि मग आम्ही निर्णय घेऊ, असं महली म्हणाले आहेत.

























































