
राहाता तालुक्यातील लोणी परिसरामध्ये आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. गेल्या तीन आठवड्यात येथे पाच बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. त्यामुळे या भागात आणखी काही बिबटे असण्याची शक्यता आहे.
लोणी-बाभळेश्वर रस्त्यालगत डॉ. सुनिल निवृत्ती आहेर यांच्या गट नंबर 162 मध्ये मक्याच्या शेतात साधारण एक वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद झाला. सदर घटनेची माहिती रावसाहेब आहेर यांनी प्राणीमित्र विकास म्हस्के यांना देताच ते घटनास्थळी पोहोचले व वनविभागाच्या वरिष्ठांना माहिती दिली. वनरक्षक गजेवार, डॉ सुनील आहेर, प्रा. महेश आहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
लोणी सादतपुरसह बाभळेश्वर परिसरात धुमाकूळ घालणारा सलग पाचवा बिबटया जेरबंद झाल्याने ग्रामस्थांसह वनविभागानेही काही अंशी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र या परिसरासह कोल्हार-भगवतीपूरमध्येही बिबट्यांची दहशत अद्याप कायम आहे. संगमनेर तालुक्यातील व लोणी जवळील सादतपुरमध्ये तीन, प्रवरानगर येथे एक तर आता बाभळेश्वर-लोणी रस्तावर एक असे पाच बिबटे वनविभागाने जेरबंद केले आहेत.
दरम्यान, 25 जानेवारीस पाच वर्षाचा चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडला होता. तत्पूर्वी लोणीत लहामागे कुटुंबियातील 9 वर्षाच्या मुलाचा बळी गेला होता. एकापाठोपाठ घडलेल्या या घटनेमुळे लोणी, बाभळेश्वरसह प्रवरानगर व कोल्हार भगवतीपूर परिसरात खळबळ उडाली होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने सादतपुरसह लोणी परिसरात विविध ठिकाणी पिंजरे लावून तसेच ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेत होते. सोबत वनखात्याचेअधिकारी व कर्मचारी ठाण मांडून होते.































































