साय-फाय – चंद्रवेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हणकर

हिंदुस्थानची अंतराळ संस्था इस्रोने नुकतीच आपल्या गगनयान या भविष्यातील मोहिमेमध्ये सहभागी होणाऱया चार पायलट्सची नावे घोषित केली आहेत. या मोहिमेच्या अंतर्गत इस्रो पहिल्यांदाच तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे. हिंदुस्थानच्या सफल अशा चंद्र आणि मंगळ मोहिमेनंतर अवकाश विश्वातील स्पर्धा अधिक चुरशीची झाली आहे असे जगभरातील अनेक अवकाश तज्ञांचे मत आहे. एकीकडे गगनयान मिशनची जोरदार तयारी सुरू असताना, दुसरीकडे अमेरिका पुढील पाच ते दहा वर्षांत पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर उतरवण्याच्या तयारीला लागली आहे. अमेरिकेच्या या स्वप्नाला चीनदेखील तशाच प्रकारच्या मोहिमेची आखणी करून टक्कर द्यायला सज्ज झालेला आहे.

शीतयुद्धाच्या काळात 1961 साली तेव्हाच्या सोव्हिएत युनियनने युरी गागारिन या अंतराळवीराला अवकाशात पाठवण्यात यश मिळवले आणि अमेरिकेसोबत सुरू असलेले जमिनीवरील शीतयुद्ध थेट अवकाशात पोहोचले. सोव्हिएत युनियनच्या या यशानंतर साहजिकच अमेरिकेवर दबाव वाढायला लागला होता. सोव्हिएत युनियनच्या या यशाने जगभरात त्यांची ताकद आणि दबदबा वाढत जाण्याची चिंता इतर देशांना सतावत होती. 1969 साली दोन अंतराळवीरांना थेट चंद्रावर उतरवून अमेरिकेने ही स्पर्धा जिंकली आणि अंतरिक्ष मोहिमांमध्ये आघाडी घेतली. त्यानंतर अपोलो मिशनच्या अंतर्गत आणखी दहा लोकांना चंद्रावर पाठवण्यात अमेरिकेला यश मिळाले.

अमेरिकेच्या या यशानंतर अवकाश स्पर्धा जवळपास थंडावत गेली. मात्र गेल्या काही वर्षांत बदलते तंत्रज्ञान, उपग्रहांचे वाढते महत्त्व आणि अंतराळ विश्वात लागलेले नवे शोध यामुळे अवकाश स्पर्धेने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. या वेळी अमेरिकेला टक्कर देण्यासाठी रशिया नसून त्याची जागा चीनने घेतली आहे. चीनला 2030 पर्यंत चंद्रावर आपला तळ उभा करायचा आहे, तर अमेरिकेला 2028 पर्यंत हे लक्ष साध्य करायचे आहे. विशेष म्हणजे या मोहिमांसाठी दोन्ही देशांची खासगी संस्थांचीदेखील मदत घेतलेली आहे. अमेरिकेची अवकाश संस्था नासाच्या चांद्र मोहिमेसाठी प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांची स्पेस एक्स कंपनी स्पेपाफ्ट बनवणार आहे.

गेल्या काही वर्षांत चीननेदेखील अंतराळ मोहिमांमध्ये मोठे यश मिळवलेले आहे. मंगळाची प्रदक्षिणा करण्याच्या सोबत मंगळावर उतरण्यातदेखील त्यांनी यश मिळवलेले आहे. दुसरीकडे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसारखे एक छोटे मॉडेल बनवण्यात चीनला यश मिळालेले आहे. सर्वात आधी साधारण दहा वर्षांपूर्वी चीनने आपले अवकाश संशोधन क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले केल्याने आज चीनला अनेक अंतराळ मोहिमांमध्ये खूप फायदा मिळाल्याचे अवकाश तज्ञ सांगतात. अर्थात अशा मोहिमांमध्ये खासगी उद्योगांनादेखील विशेष रस निर्माण झाला आहे हे महत्त्वाचे.

मानवाला चंद्रावर उतरवण्यासाठी, काही दिवस तिथे राहून संशोधन करण्यासाठी अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाची गरज भासणार आहे. या मोहिमेतील सर्वात मोठी तांत्रिक अडचण ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर यानाला सुखरूप पृथ्वीवर आणणे ही असणार आहे असे अवकाश तज्ञ सांगतात. यान जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करते, तेव्हा त्याचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे जी उष्णता निर्माण होते, त्यापासून यानाचे रक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचे काम असते. यापूर्वी मोहिमेच्या सुरुवातीस यानाचे पृथ्वीवरून यशस्वी उड्डाण होणे, अवकाशात अंतराळवीरांचे रेडिएशनपासून संरक्षण करणे आणि ठरवलेल्या जागी चंद्रावर यान यशस्वीरीत्या उतरवणे अशी अनेक आव्हाने या मोहिमेत असणार आहेत.

या मोहिमांच्या यशाकडे जगातील अनेक खासगी उद्योग लक्ष लावून बसले आहेत. अनेक देशांतील कंपन्यांना चंद्रावर मिळणाऱया विविध संसाधनांचा फायदा उचलायचा आहे आणि जोडीने चंद्रावर स्वतचा विकासदेखील घडवायचा आहे. खासगी उद्योगांचा हा रस बघून अमेरिकेने चंद्रावर संशोधन आणि तेथील संसाधनांचा वापर करण्यासाठी विविध देश आणि खासगी उद्योग यांच्यासाठी कोणते कायदे असावेत, तसेच त्यासंदर्भात विविध धोरणे आखण्याच्या उद्देशाने तीसपेक्षा जास्त देशांशी करार केला आहे.

अंतराळ स्पर्धा ही विविध देशांमध्ये रंगणार असली तरी अशा प्रत्येक यशस्वी मोहिमेचा फायदा हा संपूर्ण मानवजातीला मिळणार आहे हे महत्त्वाचे.