
अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहीत राहायचे का…?, तुम्ही जिंदा आहात…? हे प्रश्न चंद्रपूरमधील एका शाळेत चौथीत शिकणाऱया विद्यार्थिनीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले आहेत. ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पत्र पाठविण्याचे आवाहन केले होते. सध्या शाळांमध्ये हा पत्रप्रपंच सुरू आहे. चंद्रपूर जिह्यातील जि. प. प्राथमिक शाळा, गोंडगुडा (धोंडाअर्जुनी) या शाळेत चौथीत शिकणाऱया विद्यार्थिनीने पाठवलेल्या पत्रात अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहायचे का, असा थेट सवालच मुख्यमंत्र्यांना केला आहे.

व्हॉट्सऍपवरील शिक्षकांच्या विविध ग्रुपवर हे पत्र चांगलेच व्हायरल झाले आहे. ही विद्यार्थिनी आपल्या पत्रात म्हणते, ‘माननीय मुख्यमंत्री, तुम्ही दिलेले पाठय़पुस्तक मला आवडले नाही. कारण एका विषयासाठी चार-चार पुस्तके शोधावी लागतात. यापेक्षा आमचे जुने पुस्तकच छान होते. कारण सगळे गणित एका पुस्तकात, सगळे इंग्रजी एका पुस्तकात, सगळे विज्ञान एका पुस्तकात होते. त्यामुळे एकाच विषयाचे पुस्तक वाचायला मजा यायची,’ असे या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
– राज्यातील शाळांमध्ये ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावर विद्यार्थ्यांना या संदर्भात प्रतिक्रिया देऊन पत्र लिहून घेणे त्यासोबतच सेल्फी करून ती पाठवणे तसेच स्वच्छता मॉनिटर आदी उपक्रम राबवले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्रासंदर्भात हे पत्र आवडले का, या विषयावर शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडून पत्र लिहून घेण्यात येत आहेत.

































































