टाकळी खडकी रोड येथे घरफोडी, दोन लाखांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव शहरातील जुना टाकळी खडकी रोड परिसर येथील शिक्षकाची घरफोडी करून चोरट्यांनी दोन लाखाचा ऐवज चोरुन नेल्याची घटना बुधवारी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,साई गंगोत्री अपार्टमेंट, साईसृष्टी मध्ये घडली आहे. ’साई गंगोत्री अपार्टमेंट’मध्ये रहिवासी असलेले शिक्षक आशिष श्रीराम पारडे हे कामानिमित्त बाहेर गेले असताना त्यांच्या घरावर पाळत ठेवत त्यांच्या घराचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.त्यानंतर कपाटाची उचकापाचक करून कपाटातील 75 हजाराचे सोन्याचे मंगळसुत्र, 25 हजाराचे मिनी मंगळसुत्र, 37 हजार 500 रूपयांची सोन्याची चैन, 24 हजार रूपये किमतीच्या दोन अंगठ्या, 24 हजाराचे सोन्याचे कानातले व बारा हजाराची मुलाची सोन्याची चैन असा एकूण 01 लाख 97 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला आहे.

आशिष श्रीराम पारडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना स्थळी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने, पो. नि. प्रदिप देशमुख यांनी पाहणी केली. पारडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध भा. द.वि.कलम 454,380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.