सिंगदवाडी येथे आगीचे तांडव,चार घरांना लागली भीषण आग , वृद्धाचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथे शुक्रवारी चार घरांना भीषण आग लागली. या घटनेत एका वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला. थावरा भोजू पवार (75) असे मृताचे नाव आहे. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिंगरवाडी येथे येथील सुभाष थावरा पवार (50) हे शुक्रवारी आपल्या कुटुंबासह जेवण करून झोपले असताना रात्री 11.30 वाजताच्या सुमारास त्यांचे वडील राहत असलेल्या गोठावजा घराला भीषण आग लागल्याचे दिसले.

त्यांनी तातडीने व गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आगी अधिकच पसरली. या आगीने लगतच्या चार झोपड्याही कवेत घेतल्या. आगीत एकनाथ भिका जाधव, अनिल सिताराम पवार, केशव फकीरा राठोड यांची घरेही जळाली. आगीत अडकलेल्या थावरा भोजू पवार यांना गावकऱ्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांना यश आले नाही. या घटनेत थावरा पवार यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुसिंग आडे, पोलीस कर्मचारी प्रकाश चव्हाण यांनी तातडीने पुसद अग्निशमन विभाग व पोलिसांना कळविले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून आगीला आटोक्यात आणले. आज शनिवारी सकाळी घटनेचा पंचनामा करण्याकरिता तहसीलदार महादेव जोरवर व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृत थावरा भोजू पवार यांच्या मृतदेहाचे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या आगीचे कारण अस्पष्ट आहे. शासनाने पीडित कुटुंबांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.