कुकडीच्या मुख्य कालव्यास रात्रीत पाडले भगदाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण गावाजवळ असणाऱया पीरफाटा परिसरात कुकडी कालव्याला रात्रीत 12 ते 15 फूट भराव फोडून भगदाड पाडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कालव्याला भगदाड पाडून त्यामध्ये पाईप टाकून पाणी पळविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शेतकऱयांनी पाटबंधारेच्या अधिकाऱयांना माहिती दिली. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कोणतीही कारवाई न करता ‘त्यांनाही घेऊ द्या की पाणी’, अशा सूचना तक्रारदार शेतकऱयांना करत ते निघून गेले. या प्रकारामुळे या घटनेत आर्थिक तडजोड झाल्याची शंका व्यक्त करत तक्रारदार शेतकऱयांनी संताप व्यक्त केला.

सध्या सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाळा आणखी तीन महिने दूर आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व पाझर तलाव, विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत. कर्जत तालुक्यात पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे सध्या कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यातील सीना धरण तसेच कोळवडी, राशीन या परिसरातील कुकडीचे आवर्तन सुटले की मोठय़ा प्रमाणात कालव्यांची फोडाफोडी केल्याच्या घटना उघडकीस येतात. यामध्ये तडजोड करून अधिकारी मर्जीतील शेतकऱयांना पाणी फुकट देतात, असे शेतकऱयांचे म्हणणे आहे. पाटबंधारेच्या अधिकाऱयांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही. त्यामुळे अधिकारी दादागिरी करतात. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या चारही तालुक्यांमध्ये असेच चित्र आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे.

पारनेरपासून करमाळा तालुक्यामध्ये मुख्य कालव्याच्या परिसरात पाईप टाकून पाणी घेण्याच्या घटना सर्रास होत असतानाच, आता कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथे सीना धरणाकडे जाणाऱया मुख्य कालव्याला जेसीबीच्या साहाय्याने भराव खोदून भगदाड पाडल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे एका रात्रीत कालव्याला भगदाड पाडून पाईपद्वारे पाणी घेण्यात आले आहे. अशा घटनांमुळे खाली असणाऱया शेतकऱयांना कमी दाबाने पाणी मिळते. तसेच यामुळे सीना धरणावर अवलंबून असणाऱया परिसरातील अनेक गावांमधील हजारो शेतकरी पाण्यापासून वंचित राहतील. तसेच अशी भगदाड पाडल्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन भविष्यात कालव्याला भगदाड पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अधिकाऱयांची घटनास्थळी भेट, पण कारवाई काहीच नाही!

n कालव्याला रात्रीत भगदाड पाडल्याची घटना उघडकीस आल्यानंतर भोसा परिसरातील सरपंच अमोल खराडे, विकास खराडे, प्रदीप खराडे, दादा खराडे यांच्यासह शेतकऱयांनी कुकडी पाटबंधारेच्या अधिकाऱयांना याबाबत फोनवरून माहिती दिली. त्यानंतर काही अधिकाऱयांनी शनिवारी उशिरा घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मात्र, याबाबत काहीच कारवाई केली नाही. उलट अधिकाऱयांनी तक्रारदार शेतकऱयांना ‘त्यांनाही पाणी घेऊ द्या,’ असा सल्ला दिला. एवढा मोठा प्रकार आर्थिक तडजोडीशिवाय होणार नाही, असा संताप तक्रारदार शेतकऱयांनी व्यक्त करीत संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.