
समस्त धारावीकरांसाठी शनिवारचा दिवस अत्यंत अभिमानाचा राहिला. धारावीच्या झोपडपट्टीत राहणारा उमेश किल्लू हिंदुस्थानी लष्करात कमिशन्ड ऑफिसर झाला. उमेशसाठी खाकी युनिफॉर्मपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. दहा बाय पाच फुटांचे घर, घरची गरिबी, वडिलांचे आजारपण, कुटुंबाचा भार…अशा परिस्थितीतही उमेशने शिक्षणाचा निर्धार सोडला नाही. त्याने शिक्षण पूर्ण केले. आज तो आर्मी ऑफिसर बनला आहे. धारावीच्या ‘गली बॉय’ला कडक सॅल्युट!
चेन्नई ऑफिसर ट्रेनिंग
अॅकॅडमीमध्ये 9 मार्च रोजी उमेशची पासिंग आऊट परेड झाली. या कार्यक्रमाला त्याची आई आणि बहिणी उपस्थित होत्या. त्यांच्यासाठी हा अभिमानाचा आणि भावुक असा क्षण होता. त्यानंतर धारावीत उमेशचे जंगी स्वागत झाले.
उमेश स्कॉलरशिपवर शिकला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याने सायबर पॅफेमध्ये अर्धवेळ नोकरी केली. त्याने बीएसएसी आयटी केले. कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर डिग्री मिळवली. सर्विसेस सिलेक्शन बोर्डच्या परीक्षेसाठी त्याने 12 वेळा प्रयत्न केले. उमेशचे वडील पेंटर होते. 2013 मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. तेव्हापासून ते अंथरुणाला खिळून होते. गेल्या वर्षी उमेश सैन्य प्रशिक्षणासाठी रिपोर्ट करायला जाण्याच्या एक दिवस आधी त्याच्या वडिलांचे निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी एक दिवस येऊन उमेश पुन्हा अॅकॅडमीत गेला. 11 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तो आज कमिशन्ड ऑफिसर झालाय.
मी धारावीतला पहिला लष्करी अधिकारी झालो. खूप आनंदाचा क्षण आहे. धारावीतील मुले माझ्यामुळे प्रेरित होऊन सैन्यात सामील होतील, अशी मी आशा करतो. आयुष्यात ध्येय ठेवाल, कठोर मेहनत कराल, तर यश तुमचेच आहे.
– उमेश किल्लू, कमिशन्ड ऑफिसर



























































