पांढऱया चेंडूवर हिंदुस्थानचेच वर्चस्व; कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या अकरा वर्षांत हिंदुस्थानला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये जगज्जेतेपद संपादता आले नसले तरी आपल्या खेळाच्या जोरावर हिंदुस्थानने तिन्ही क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. हिंदुस्थान तिन्ही क्रिकेटचा राजा होता, मात्र ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचे कसोटीतील अव्वल स्थान हिसकावून घेतले आहे. मात्र पांढऱया चेंडूने खेळल्या जाणाऱया वन डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये हिंदुस्थानने आपली हुकमत कायम राखली आहे.

आयसीसीने आज जाहीर केलेल्या वार्षिक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया 124 गुणांसह कसोटीत अव्वल ठरला आहे, तर हिंदुस्थानने 120 गुणांसह दुसरे स्थान संपादले आहे. गेल्या वर्षी झालेल्या कसोटी अजिंक्यपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा 209 धावांनी पराभव करत जगज्जेतेपदाला गवसणी घातली होती. वन डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये हिंदुस्थानच्या वर्चस्वाला कुणीही आव्हान देऊ शकलेला नाही. आयसीसीने जाहीर केलेली क्रमवारीत 2021 नंतर झालेल्या सर्व मालिकांचा समावेश करण्यात आला आहे. कसोटी क्रमवारीत हिंदुस्थानचे अव्वल स्थान ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत 2-1 ने झालेल्या पराभवामुळे गमवावे लागले आहे.

 हरूनही हिंदुस्थान वन डेत अव्वल

हिंदुस्थानला वन डे वर्ल्ड कपमध्येही ऑस्ट्रेलियाकडूनच हार सहन करावी लागली होती. मात्र आयसीसीच्या क्रमवारीत हिंदुस्थानने 122 गुणांसह वन डेचे अव्वल स्थान स्वतःकडेच राखले आहे. ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी जगज्जेतेपद पटकावण्यात यश मिळवले असले तरी ते क्रमवारीत हिंदुस्थानपेक्षा सहा गुणांनी मागे असल्यामुळे त्याला दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. वन डे वर्ल्ड कपमध्ये सातत्यपूर्ण विजयामुळे हिंदुस्थानला क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यात यश लाभले आहे. मात्र अन्य कोणत्याही स्थानामध्ये बदल झालेला नाही. दक्षिण आफ्रिका (112), पाकिस्तान (106) आणि न्यूझीलंड (101) हे तीन संघ टॉप फाइव्हमध्ये कायम आहेत.

टी-20 तही हिंदुस्थानचा पहिला नंबर

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मागे टाकत दुसरे स्थान संपादले असले तरी हिंदुस्थानच्या अव्वल स्थानाला कुणीही हात लावू शकला नाही. हिंदुस्थानने 264 गुणांसह शीर्ष स्थान कायम राखले असले तरी ऑस्ट्रेलिया 259 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडपेक्षा दोन गुणांनी मागे आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ 250 गुणांसह चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात केवळ तीन गुणांचा फरक असला तरी विंडीज सहाव्या स्थानावर आहे.