
गेले दोन सामने पावसामुळे रद्द झाल्यामुळे आयपीएलच्या प्ले ऑफचा सारा सस्पेन्सच संपला. प्ले ऑफचा चौथा कोण हे ठरवणारा सामना बंगळुरू आणि चेन्नई यांच्यात शनिवारी होणार असला तरी या सामन्यावरही पावसाचे संकट कायम आहे. प्ले ऑफसाठी महत्त्वाचा असलेल्या सामन्यात दोन्ही संघांनी पावसाची बॅटिंग होऊ नये म्हणून ‘जारे जारे पावसाची’ आळवणी केली आहे. त्यामुळे बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पुणाची बॅटिंग पाहायला मिळते ते उद्याच कळू शकेल.
आयपीएलचे यंदाचे पर्व हे अंतिम टप्यात आले असून तीन संघांनी प्ले ऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. कोलकाता, हैदराबाद आणि राजस्थान यांना प्ले ऑफचे तिकीट मिळाले असले तरी अद्याप चौथ्या क्रमांकाचा संघ निश्चित झालेला नाही. उद्या बंगळुरू येथे होणाऱया बंगळुरूविरूद्ध चेन्नई यांच्या सामन्यानंतर तो चौथा संघ कोणता असेल? याचे चित्र स्पष्ट होईल. प्ले ऑफचे पहिले तीन संघ निश्चित झाल्यामुळे उद्या बंगळुरू आणि चेन्नईत होणाऱया सामन्याची रंगत आणखी वाढली आहे. मात्र, उद्याच्या सामन्यात बंगळुरूला केवळ विजय मिळवून चालणार नाही, तर विजयाबरोबर बंगळुरूला नेट रनरेटचं गणितही साधावं लागणार आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात खऱया अर्थाने चुरस पाहायला मिळणार आहे.
सध्याच्या घडीला चेन्नई 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे, तर बंगळुरू 12 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. लखनौ संघालादेखील आजच्या सामन्यात विजय मिळवला तर प्ले ऑफची संधी मिळू शकते, मात्र लखनऊचा नेट रनरेट हा बंगळुरू आणि चेन्नई यांच्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे चौथ्या स्थानाचा संघ कोणता याचा निकाल हा उद्याच्या सामन्यातूनच लागणार आहे, मात्र बंगळुरूला केवळ विजय मिळवून चालनार नाही, तर चेन्नईपेक्षा रन रेट अधिक व्हावा यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. बंगळुरूने प्रथम फलंदाजी घेतली तर 200 धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवून तो सामना कमीत कमी 18 धावांनी जिंकावा लागणार आहे. बंगळुरूला धावांचा पाठलाग करताना सामना 11 चेंडू शिल्लक ठेवून जिंकावा लागणार आहे.
…तर बंगळुरू बाहेर
आयपीएलवर पावसाची वक्रदृष्टी कायम राहिली तर प्ले ऑफचे स्वप्न रंगवत असलेल्या बंगळुरूचे आव्हान आपोआप संपेल. काल हैदराबादमध्येही पावसाच्या हजेरीमुळे दिल्ली, लखनऊची सुट्टी झाली होती. अशीच पृपा बंगळुरूतही राहिली तर बंगळुरूचे खातेही बंद पडणार. बंगळुरूला प्ले ऑफ गाठायचे असेल तर पावसाने विश्रांती घेतली तरच ते विजयासाठी पूर्ण प्रयत्न करू शकतील. पाऊस नसेल तर बंगळुरू प्ले ऑफच्या शर्यतीत चौथे स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू शकतील. अन्यथा चौथा संघ म्हणून चेन्नई आगेकूच करील.
विजयाच्या षटकारासाठी सज्ज
बंगळुरू आयपीएलमध्ये अनोखा भीमपराक्रम करण्याच्या उंबरठय़ावर आहे. सलग सहा पराभवांची नामुष्की भोगल्यानंतर बंगळुरूचे आव्हान जवळजवळ संपुष्टात आले होते. त्यानंतर त्यांचे प्ले ऑफमध्ये प्रवेश करणे जवळजवळ अवघड होते. पण सात पराभवानंतर पेटून उठलेल्या बंगळुरूने सलग पाच सामने जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आयपीएलच्या इतिहासात सलग सहा पराभवांनंतर सलग पाच विजय मिळवणारा बंगळुरू पहिलाच संघ ठरला आहे. जर उद्या चेन्नईला नमवले तर बंगळुरू एकाच मोसमात पराभव आणि विजयाचा षटकार ठोकणारा पहिलाच संघ ठरेल. एवढेच नव्हे तर त्यांना चेन्नईला हरवून प्ले ऑफ गाठण्याचीही नामी संधी आहे. फक्त त्यांना चेन्नईविरुद्ध 18 पेक्षा अधिक धावांची किंवा विजयी लक्ष्य 19 व्या षटकांपूर्वी गाठण्याची धडपड करावी लागणार आहे.



























































