
कामोठे वसाहतीमधील ड्रीम हाऊसिंग सोसायटीमध्ये एका बंद फ्लॅटच्या आत आज वृद्ध आईसह तिच्या मुलाचा मृतदेह सापडला. गीता जग्गी (70) व जितेंद्र जग्गी (45) अशी त्यांची नावे आहेत. मायलेकांची हत्या करण्यात आली की तो आत्महत्येचा प्रकार आहे याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र वृद्ध आई व तिच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कामोठे वसाहतीमधील बंद असलेल्या रूम नंबर 104 मध्ये हा प्रकार घडला. आज दुपारी जग्गी यांचे नातेवाईक घराचा दरवाजा ठोठावला. पण आतून दरवाजा उघडला न गेल्याने त्यांनी पोलीस पंट्रोल व फायर ब्रिगेडशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. कामोठे पोलिसांचे पथक व फायर ब्रिगेड लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आतमध्ये गॅससदृश्य वास येत असल्याचे दिसून आले.रूममध्ये राहणाऱ्या गीता जग्गी व तिचा मुलगा जितेंद्र हे मृत अवस्थेत दिसून आले. याबाबत कामोठे पोलिसांनी अधिक तपास करीत आहेत.
हत्या की आत्महत्या?
दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन एमजीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले आहेत. त्याचप्रमाणे घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करण्यात येत आहे. याबाबत पुढील तपास कामोठे पोलीस करीत असून शवविच्छेदनानंतरच ही हत्या आहे की आत्महत्या याचा उलगडा होणार आहे. मुलासह वृद्ध मातेचाही मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.