
सिडको वाळूज महानगरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासंदर्भात सिडको प्रशासनाने फेब्रुवारी २०२३ मध्ये लेखी आश्वासन दिल्यानंतर दोन वर्षात कुठल्याच आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे सिडकोच्या आश्वासनाच्या पत्राचे वर्षश्राद्ध घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे उपशहरप्रमुख दत्तात्रय वर्षे यांनी निषेध आंदोलन केले. या आंदोलनाने सिडको प्रशासनाच्या खोट्या आश्वासनाचे पितळ उघडे पडताच आंदोलनकर्त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिडको वाळूज महानगरात कामगारांसाठी एलआयजी व एमआयजी नागरी वसाहत स्थापनेला ३० वर्ष झाले आहे. त्यामुळे ही ड्रेनेजलाईन आता जीर्ण झाली असून, अनेक ठिकाणी लीक झाल्यामुळे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे ही ड्रेनेजलाईन बदलणे, अंतर्गत रस्त्यांची कामे, पथदिवे तसेच खेळाच्या मैदानाची दुरवस्था, परिसरात उभारण्यात आलेली कार्यालये, पोलीस चौकी, अंगणवाडी, भाजीमंडईसह सर्व इमारती सुरू कराव्यात. रुग्णालय उभारणे, लोंबकळलेल्या विद्युत तारा दुरुस्त करणे यासह जवळपास १४ मूलभूत सोयी-सुविधांच्या मागण्यांसाठी शेकडो कार्यकर्त्यांसह सिडको कार्यालयासमोर शिवसेना उपशहरप्रमुख दत्तात्रय वर्षे यांनी २१ फेब्रुवारी २०२३ मध्ये बेमुदत उपोषण केले होते. या मागण्या सोडविण्यासाठी सिडकोचे तत्कालीन कार्यकारी अभियंता कपिल राजपूत, तत्कालीन मालमत्ता अधिकारी अस्मिता विर्शीद यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करून त्या सोडविण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले. त्यानंतर दत्तात्रय वर्षे यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, सिडकोने दिलेल्या लेखी आश्वासनाची वारंवार आठवण करून देत समस्या सोडवा, अशी मागणी उपशहरप्रमुख वर्षे यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. मात्र, त्याकडे डोळेझाक होत असल्याने नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा; अन्यथा आश्वासनाचे श्राद्ध आंदोलन करू असा इशारा वर्षे यांनी सिडको प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला. आज शुक्रवारी वर्षे यांनी सिडको कार्यालयासमोरील मोकळ्या मैदानावर आश्वासनाचे श्राद्ध घालण्याचे आनोखे आंदोलन केले. या आंदोलनातील मंत्रघोषाने परिसरातील शांतता भंग झाल्याचा कांगावा सिडकोच्या आश्वासनाचे पत्र देणाऱ्या अभियंता कपील राजपूत यांनी करून आंदोलनकर्ते वर्षे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.