इमानदारी, शिस्त अन् विश्वासाचे दर्शन, 24 हजार जपानींनी स्वतःहून भरला टोल

जपानी लोक इमानदारी आणि आपलेपणासाठी जगभरात ओळखले जातात. जपानी लोकांनी नुकतेच एका प्रसंगात सार्वजनिक शिस्त, इमानदारी आणि विश्वासाचे अनोखे दर्शन घडवले. जपानमध्ये एक्सप्रेसवेवरील स्वयंचलित टोल यंत्रणा बंद पडली. याचा फटका टोकियो आणि सात अन्य प्रांतातील 106 पेक्षा अधिक टोल नाक्यांना बसला. टोल गेट सुमारे 38 तास बंद पडले. यामुळे महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. टोकियोतील टोमेई आणि चुओ एक्सप्रेसवे, कनागावा, यामानाशी, नागानो, शिजुओका ऐची, गिफू आणि मीई प्रांतातील 106 टोल गेटवर परिणाम झाला. अशावेळी कोणताही गोंधळ, गदारोळ न करता टोल प्लाझा संचालिक करणाऱया पंपन्यांनी संयम दाखवला. टोल कंपन्यांनी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवत ट्रफिक जॅम होऊ नये म्हणून टोल बॅरियर हटवले. कोणताही टोल न देता गाडय़ांना जाऊ दिले. यंत्रणा सुरळीत सुरू झाल्यावर ऑनलाईन टोल भरा, असे प्रवाशांना सांगण्यात आले आणि त्यानंतर जपानी लोकांनी आपल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय दिला. काही वेळातच सुमारे 24 हजारांहून अधिक वाहन चालकांनी स्वेच्छेने ऑनलाईन टोल भरला.