
मुंबईने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत राजस्थानचा तब्बल 100 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने राजस्थानला 218 धावांच आव्हान दिलं होतं. रायन रिकेलटन (38 चेंडू 61 धावा), रोहित शर्मा (36 चेंडू 53 धावा) हार्दिक पंड्या (23 चेंडू 48 धावा) आणि सूर्यकुमार यादव (23 चेंडू 48 धावा) या चौघांनी राजस्थानची अक्षरश: धुलाई केली. राजस्थानला जिंकण्यासाठी 218 धावांची गरज होती. मागचा सामना जिंकल्यामुळे राजस्थान कडवी झुंज देणार, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानला चितपट केलं. ट्रेंन्ट बोल्ट आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने 2, दीपक चहर आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 1-1 विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. मुंबईच्या भेदक माऱ्यापुढे राजस्थानचा संघ 117 धावांमध्येच गार झाला. या विजयासह मुंबईने 14 गुणांची कमाई करत गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे.