
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत ज्येष्ठ पत्रकार संजय शर्मा यांचे ‘4 पीएम’ हे यूटय़ूब न्यूज चॅनेल केंद्र सरकारने बंद केले होते. त्याला शर्मा यांनी सर्वेच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी कोणत्या तथ्यांच्या आधारे राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देऊन हे यूटय़ूब चॅनेल बंद केले, असा सवाल करत याबाबत उत्तर देण्याचे निर्देश सर्वेच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. या याचिकेवर आता पुढील आठवडय़ात सुनावणी होणार आहे.
यूटय़ूब चॅनेल ब्लॉक करण्याआधी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. चॅनेल ब्लॉक केल्याचे मध्यस्थांमार्फत समजले. अशाप्रकारची कारवाई घटनाबाह्य असून चॅनेल ब्लॉक करण्याचे आदेश रद्द करण्यात यावेत, अशी विनंती करणारी याचिका दाखल करत संजय शर्मा यांनी केंद्राच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. आज न्यायमूर्ती बी. आर. गवई व न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. तेव्हा सर्वेच्च न्यायालयाने यूटय़ूब चॅनेल बंद करण्यासंदर्भातील दाखल इतर याचिकांसोबत एकत्रित सुनावणी घेण्याचा मानस बोलून दाखवला. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी अंतरिम आदेश देण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने यावेळी एकतर्फी अंतरिम आदेश पारीत करण्यास नकार दिला तसेच केंद्राला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
संजय शर्मा यांचा युक्तिवाद काय?
राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ाचा एखादे यूटय़ूब चॅनेल बंद करण्यासाठी गैरवापर केला जाऊ शकत नाही. अशाप्रकारे बंदीसाठी योग्य कारण देणे गरजेचे आहे, अशी बाजू संजय शर्मा यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली.