
140 कोटींचा हा देश आहे. हिंदुस्थानने सीमेवर सू सू केली तरी पाकिस्तान वाहून जाईल, असा हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पाकिस्तानवर केला आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली आहे.
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “जे दहशतवादी आहेत, ते अद्याप सापडले नाहीत. ते सीमेपार गेलेत की, सीमेच्या आत आहेत? ज्याप्रमाणे 300 किलो आरडीएक्स आणण्यात आलं आणि ते कोणी आणलं? तेही सापडेल नाही. यातून एक स्पष्ट होतं की, या सरकारला दहशतवादी हा सापडत नाहीत. सुरक्षेचा प्रश्न का वाऱ्यावर सोडला? या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकार जे निर्णय घेईल, त्यामध्ये आम्ही सरकारसोबत आहोत, ही आमची भूमिका आहे. अशातच उद्या सरकारची भूमिका जर युद्धाची असेल, तर त्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका त्यांना समर्थन देण्याची आहे. पण वेळ का घालवत आहात?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, “पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे आणि सरकारने ते तातडीने करावं, अशी आमची अपेक्षा आहे. मॉकड्रीलचा फक्त दिखावा होऊ नयेत. लढाई करा आणि संपून टाका. इंद्रा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. तसेच पाकिस्तानच्या लाहोरपर्यंत सैन्य घुसवलं होतं. ही ताकद त्या काळात होती. आता तर युद्धासाठीची आपल्या देशाकडे असलेली शक्ती प्रचंड मोठी आहे. ती काय पाच ते दहा वर्षात आलेली नाही. ती अनेक दिवसांपासूनची आपली तयारी आहे. 140 कोटींचा हा देश आहे. हिंदुस्थानने सीमेवर सू सू केली तरी पाकिस्तान वाहून जाईल.”