
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांच्या सहमतीनंतर हिंदुस्थानच्या सैन्याची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत हिंदुस्थानच्या सैन्याने पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडत खरा चेहरा जगासमोर आणला. हिंदुस्थानच्या हवाई दलाच्या तळांवर हल्ला केल्याचा खोटा दावा पाकने केला होता. हा दावा हिंदुस्थानने पूर्णपणे फेटाळून लावला. पाकिस्तानचे दावे म्हणजे अपप्रचार आहेत. आणि हिंदुस्थानची कृती संयमित आणि संतुलित आहे, असे सांगत सैन्याने पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडला.
ऑपरेशन बन्यान-अल-मारसूस अंतर्गत हिंदुस्थानच्या हवाई दलाचे हवाई तळ, S-400 प्रणाली, वीजपुरवठा आणि सायबर पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. हा दावा हिंदुस्थानच्या सैन्याने पत्रकार परिषदेत स्पष्टपणे फेटाळून लावला. हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे, दिशाभूल करणारे आणि अपप्रचार आहे. देशाच्या सुरक्षेला कोणताही धोका पोहोचलेला नाही, असे हिंदुस्थानच्या सैन्याने स्पष्ट केले.
पाकिस्तानचे 5 खोटे दावे, हिंदुस्थानच्या सैन्याने सांगितले सत्य
1 – सूरतगड, सिरसा आणि उधमपूर येथील S-400 रडार तळासह कोणत्याही लष्करी किंवा नागरी पायाभूत सुविधांना कोणतेही नुकसान झाले नाही, असे सांगत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पाकिस्तानचे दावे फेटाळून लावले.
2 – पाकिस्तानने केलेल्या बहुतेक घोषणा चुकीच्या माहितीवर, खोट्या आणि अपप्रचारावर आधारित आहेत. हिंदुस्थानने फक्त प्रत्युत्तर दिले आहे. आणि ते संयमित आणि केवळ सैन्य तळांवर लक्ष्य केंद्रीत होते, असे परराष्ट्र सचिव मिसरी म्हणाले.
3 – JF 17 ने हिंदुस्थानच्या S-400 आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र तळाचे नुकसान केल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे निराधार आणि खोटा आहे, असे कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या. हिंदुस्थानचे हवाई तळ आणि ब्रह्मोस प्रणाली नष्ट केल्याचा चुकीचा प्रचार पाकिस्तानने केला, असे हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.
4 – पठाणकोट, भटिंडा, नालिया, सिरसा, जम्मू आणि भूज येथील हिंदुस्थानच्या हवाई दलाच्या तळांचे मोठे नुकसान झाल्याची चुकीची माहिती पाकिस्तानने पसरवली. व्यास आणि चंदीगडमधील आपल्या दारूगोळा डेपोचे नुकसान झाल्याची खोटी माहितीही पाकने पसरवली, असेही त्यांनी सांगितले.
5 – धार्मिक स्थळांना लक्ष्य केल्याच्या आरोपही हिंदुस्थानच्या सैन्याने पूर्णपणे फेटाळून लावले. हिंदुस्थान एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आपले सैन्य संविधानाच्या मूल्यांचा पूर्णपणे आदर करते. आम्ही कोणत्याही धार्मिक स्थळाला लक्ष्य केले नाही, असे कर्नल कुरेशी म्हणाल्या. पाकिस्तानने केलेली घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने मुरीद, रफीकी, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियान हवाई तळांसह अनेक पाकिस्तानी ठिकाणांवर अचूक हल्ले केले, असे सैन्याकडून सांगण्यात आले.