योगासनात महाराष्ट्राला दुहेरी यश; रिदमिकच्या पेअरमध्ये दोन्ही गटांत सुवर्ण अन् रौप्य

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील योगासन स्पर्धेत रविवारी धडाकेबाज सुरूवात केली. रिदमिक योगासन पेअरमध्ये महाराष्ट्राने मुलांच्या आणि मुलींच्या गटात सुवर्ण अन् रौप्यपदके जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजविले. महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी चार पदके जिंकून आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली.

मुलांच्या रिदमिक योगासन पेअर स्पर्धेत रोहन तायडे-अंश मयेकर आणि प्रणव साहू-अर्यन खरात या महाराष्ट्रीयन जोडयांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. सुवर्णपदक विजेत्या रोहन-अंश जोडीने 129.50 गुणांची, तर रौप्यदपक विजेत्या प्रणव-अर्यन जोडीने 129.20 गुणांची कमाई केली. सरांश कुमार व अभिषेक कुमार या बिहारच्या जोडीने 127.37 गुणांसह कांस्यपदक जिंकले. मुलींच्या रिदमिक योगासन पेअर स्पर्धेत रुद्राक्षी बावे व प्रांजळ व्हान्ना या महाराष्ट्राच्या जोडीने 131.19 गुणांसह सुवर्णपदकावर मोहर उमटवली. तृप्ती डोंगरे व देवांशी वाकले या जोडीने 130.44 गुणांसह रौप्यपदक जिंकले. स्पृहा कश्यप व भाबना बोरा या आसामच्या जोडीने 127.26 गुणांसह कांस्यपदकाला गवसणी घातली.

जिम्नॅस्टिक्स ः सारा, अनुष्का, किमया, सनय, काैस्तुभ पदकाचे दावेदार
नवी दिल्ली ः महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक पथकातून सारा राऊळ, अनुष्का पाटील, शताक्षी टक्के, उर्वी वाघ, किमया कार्ले, यशश्री मोरे,तर मुलांमध्ये सनय किर्लोस्कर आणि काwस्तुभ अहिरे हे खेळाडू सातव्या खेलो इंडिया युवा स्पर्धा पदकाचे दावेदार आहेत.

जिम्नॅस्टिक या प्रकाराला नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये रविवार, 11 मेपासून सुरुवात झाली. गत खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने संयुक्ता काळे हिने जिंकलेल्या पाच सुवर्णपदकसह एकूण 12 पदके जिंकली होती. यावेळी संयुक्ताचे वय स्पर्धेसाठी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने ती संघात नाही. यावेळी 11 मुले आणि 9 मुली असे महाराष्ट्राच्या एकूण 20 खेळाडूंचे पथक जिम्नॅस्टिकमध्ये सहभागी झाले आहे.

अॅथलेटिक्स, कुस्ती आजपासून
पाटणा ः बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा आता उत्तरार्ध सुरू झालाय. अॅथलेटिक्स स्पर्धेचा थरार उद्या, सोमवार 12 मेपासून पाटणा शहरातील पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये रंगणार आहे. कुस्ती स्पर्धेलाही सोमवारपासून सुरुवात होत असून दहापेक्षा अधिक पदकांची अपेक्षा आहे.

अॅथलेटिक्समध्ये यंदा 1 7 मुली व 11 मुले असा एकूण महाराष्ट्राचा 28 खेळाडूंचा संघ मैदानावर आपले काwशल्य पणाला लावताना दिसेल. गतवर्षीच्या खेलो इंडिया स्पर्धेत त महाराष्ट्राने 38 खेळाडूंचा चमू मैदानावर उतरविला होता. त्यावेळी महाराष्ट्राने 5 सुवर्ण, 6 रौप्य व 7 कांस्य अशी एकूण 18 पदकांची लयलूट केली होती. यावेळीच्या संघात मुलांची संख्या कमी आहे, मात्र तरीही महाराष्ट्राचे खेळाडू नक्कीच डझनभर पदके जिंकलीत. शौर्या अंबुरे हिच्याकडून 100 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

खेलो इंडिया स्पर्धेत कुस्तीतही महाराष्ट्राची कामगिरी उंचावली आहे. गत तामीळनाडू स्पर्धेत 4 सुवर्ण, 4 रौप्य व 6 कांस्य अशी एकूण 14 पदकांची लयलूट मराठमोळय़ा कुस्तीगीरांनी केली होती. यंदाही मुले 19, मुली 7 असे एकूण 26 मल्लांचा संघ आखाडय़ात उतरणार आहे. गत स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सोहम कुंभार, रौप्यपदक विजेता सोमराज मोरे रौप्य, कांस्य पदकाचा मानकरी ठरलेला आदित्य ताटे सलग दुसऱया पदकासाठी सज्ज झाले आहेत.