हिंदुस्थानला चोख प्रत्युत्तर देणार; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पुन्हा दर्पोक्ती

ऑपरेशन सिंदूरच्या तडाख्याने बिथरलेल्या पाकिस्तानची मस्ती अजूनही जिरेना. पाकिस्तान हा शांतताप्रिय देश असून हिंदुस्थानच्या हल्ल्याला स्वसंरक्षणार्थ चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली आहे. शाहबाज शरीफ यांनी आज यौम ए तशक्कुर साजरा केला. पाकिस्तानी सैन्याला यावेळी त्यांनी सन्मानित केले.

या समारोहादरम्यान केलेल्या भाषणात त्यांनी हिंदुस्थानविरोधात फूत्कार काढले. शरीफ यांच्या इस्लामाबाद येथील प्रधानमंत्री निवासात यौम-ए-तशक्कुर साजरा करण्यात आला. यावेळी पाकिस्तानचा ध्वज फडकावण्यात आला. पाकिस्तानी सैन्याने देशाच्या इतिहासात हिंदुस्थानी लष्कराला प्रत्युत्तर देऊन सुवर्ण अध्याय लिहिला आहे असे शरीफ म्हणाले.

ब्राम्होसने एअरबॉर्न वार्निंग सिस्टिम नष्ट केल्याची कबुली

हिंदुस्थानच्या हल्ल्यात पाकिस्तानची एअरबॉर्न वार्निंग अँड कंट्रोल सिस्टम असलेले विमान नष्ट झाल्याची कबुली पाकिस्तानचे माजी हवाई दल प्रमुख मसूद अख्तर यांनी दिली आहे. हिंदुस्थानने भोलारी एअरबेसवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 9 आणि 10 मेच्या रात्री हिंदुस्थानने एअरबेसवर सलग चार ब्राम्होस क्षेपणास्त्रे डागली. आमचे वैमानिक त्यांचे विमान वाचवण्यासाठी धावले, पण क्षेपणास्त्रे येतच राहिली. चौथे क्षेपणास्त्र भोलारी एअरबेसच्या हँगरवर आदळले, असे अख्तर म्हणाले.