
काबूलमधील तालिबानी राजवटीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कडाडून निषेध केल्याचे वृत्त आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असे म्हणत हिंदुस्थानने अफगाणिस्तानचे आभार मानले आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
आमीर खान मुत्ताकी यांच्याशी चर्चा केल्यानंतर एस. जयशंकर यांनी एक्सवरून पोस्ट केली. यात त्यांनी मुत्ताकी यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल सांगितले. आज सायंकाळी अफगाणिस्ताननचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री मौलवी आमीर खान मुत्ताकी यांच्याशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. त्याचे मी स्वागत करतो. खोट्या आणि निराधार वृत्तांच्या आधारे हिंदुस्थान व अफगाणिस्तानमध्ये अविश्वास निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु त्याला मुत्ताकी यांनी ठामपणे नकार दिला, त्याचेही मी स्वागत करतो, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
पारंपरिक मैत्री आणि विकासाला पाठिंबा
अफगाणिस्तानी लोकांसोबत हिंदुस्थानी पारंपरिक मैत्री आणि विकासाच्या मुद्द्यावर उभय देशांचा एकमेकांना पाठिंबा असल्याचे एस. जयशंकर म्हणाले. मुत्ताकी यांच्याशी दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी वाढवण्याचे मार्ग आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात उभय देश संयुक्तपणे प्रयत्न करताना दिसतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी हिंदुस्थानने पहलगाम हल्ल्यानंतर ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’अंतर्गत तालिबानला कामाला लावले होते. हिंदुस्थान तालिबानच्या मदतीने कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला होता. ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’ म्हणजे अशी मोहीम ज्यात कारवाई करणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे लपवलेली असते. मात्र या बातम्या हास्यास्पद असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.