मेट्रोचे काम अडवणाऱ्या नरेंद्र मेहतांना मुख्यमंत्र्यांनी झाप झाप झापले; एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी तक्रार करताच काढली खरडपट्टी

भाईंदरकरांच्या मेट्रोच्या कामात आडकाठी आणणारे भाजप आमदार नरेंद्र मेहतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झाप झाप झापले आहे. काशीगाव मेट्रो स्थानकाच्या बाजूची जागा आपल्या मालकीचे असल्याचे सांगत मेहतांनी काम करण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे दोन वर्षांपासून या स्थानकाच्या जिन्याचे काम लटकले होते. याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी तक्रार करताच त्याची गंभीर दखल घेत फडणवीस यांनी मेहतांची खरडपट्टी काढली. त्यामुळे रखडलेल्या या जिन्याचे काम अखेर सुरू झाले.

दहिसर-काशीगाव हा मेट्रोचा पहिला टप्पा आधी सुरू होणार असला तरी छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील प्लेझंट पार्क-विनयनगर या ठिकाणी बांधल्या गेलेल्या काशीगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम आमदार नरेंद्र मेहता यांनी हरकत घेतल्याने लटकले आहे. मेट्रो 9 मार्गिकेचे लोकार्पण दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात रखडलेल्या काशीगाव मेट्रो जिन्यासंदर्भात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यात मेहता यांना मोबदला हवा असल्याने त्यांनी हे काम थांबवल्याची तक्रार केल्याची चर्चा आहे. दरम्यान याची दखल घेत फडणवीस यांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांसमोरच मेहता यांना बोलावून रखडलेल्या जिन्यावरून जाब विचारला. मेहता विकासाच्या आड येऊ नका, अशी खरडपट्टी काढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या या जिन्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

दादागिरीला अधिकाऱ्यांचा दणका
काशीगाव मेट्रो स्थानकाचा जिना पालिकेने विकसित केलेल्या 45 मीटर विकास आराखड्यातील भाईंदर ते काशीगाव या मार्गावर आहे. त्या बाजूला नाला असून त्या ठिकाणी मेहता यांची जमीन आहे. मात्र काही वर्षांपूर्वी ही जमीन विकत घेताच मेहतांनी मेट्रोचे काम रोखून धरले. त्यानंतर तत्कालीन पालिका आयुक्त संजय काटकर यांनी ठराव करून सदरील जागेचे भूसंपादन करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावदेखील पाठवला होता.

मेहतांचा कांगावा
मेहतांनी पत्रकार परिषद घेऊन आपण स्वतः पालिकेला पत्र देऊन जागा ताब्यात घ्या व शासन धोरणानुसार मोबदला देण्याची मागणी केली आहे. चेन्ने येथील जागेसाठी 29 कोटी रुपयांचा मोबदला पालिकेने एका राजकीय व्यक्तीला दिला आहे. त्यानुसार आम्हालादेखील मोबदला मिळावा. मात्र पत्र देऊनसुद्धा पालिका जागा आपल्या ताब्यात घेत नसल्याचा कांगावा मेहता यांनी केला आहे.