सहाय्यक परिचारिकांना पदोन्नती नाकारल्यास न्यायालयात दाद मागू! महापालिका प्रशासनाला इशारा

मुंबई महापालिकेच्या माता बाल संगोपन विभागातील सहाय्यक परिचारिका प्रसविका पदावरील कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती नाकारण्याचा निर्णय बेकायदेशीर आणि अन्यायकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा. नाहीतर या विरोधात न्यायालयात दाद मागू, असा इशारा दि म्युनिसिपल युनियनने महापालिकेला दिला आहे.

मुंबई महापालिकेच्या 24 जुलै 2007 रोजीच्या नियमानुसार, 7 जुलै 2005 पासून पूर्वलक्षी प्रभावाने साहाय्यक परिचारिका प्रसविका कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदाची कालबद्ध पदोन्नती देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, ग्रेड पे 4200 प्रमाणे वेतन निश्चिती करण्यात आली होती. मात्र, सध्या प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना ग्रेड पे 2700 प्रमाणेच पदोन्नती दिली जात असल्याचे सांगितले आहे. मात्र, हे सर्व जे नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याचा आरोप युनियनने केला आहे.

मुंबई महापालिकेने कालबद्ध पदोन्नतीसाठी सार्वजनिक आरोग्य परिचारिका हे नवे पद सुचवले असून त्या पदासाठी पात्रता नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. याबाबत युनियनने कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती.