
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उद्या मंगळवार आणि बुधवारी जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असल्याने वादळी सरी बरसण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, मात्र घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
देशात मान्सून यावर्षी नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच दाखल होणार असून केरळमध्ये 27 मेपासून पाऊस बरसणार आहे. यानंतर आठ दिवसांमध्ये मान्सून कोकण आणि महाराष्ट्रात दाखल होईल. असे असताना सध्या मुंबई-ठाण्यासह राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची धांदल उडवून दिली आहे. पावसामुळे शहरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी अनेक जिह्यात शेतीचे नुकसान झाले असून झाडेही कोसळली आहेत.
नाशिक, पुण्याला खबरदारीचा ‘ऑरेंज’ अलर्ट
मध्य महाराष्ट्रापासून कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे नाशिक आणि पुण्यामध्ये खबरदारीचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर कोकणसाठी दोन दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर दक्षिण कोकणासाठी बुधवारपासून ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.