मनरेगा घोटाळाप्रकरणी गुजरातमधील भाजप मंत्र्याच्या दोन मुलांना अटक

दाहोद जिह्यातील देवगड बारिया आणि धनपूर तालुक्यांमध्ये मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायद्यातील 71 कोटींच्या घोटाळाप्रकरणी गुजरातचे मंत्री बच्चू खाबड यांचा धाकटा मुलगा किरण याला अटक करण्यात आली आहे. याआधी बचू खाबड यांचा मोठा मुलगा बळवंत याला अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील मंत्र्याच्या दोन मुलांना मनरेगा घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आल्यामुळे आता भ्रष्टाचाराचे गुजरात मॉडेल समोर आले आहे.

याप्रकरणी किरणसह आणखी तिघांना अटक करण्यात आली असून मनरेगा घोटाळ्यातील अटक आरोपींची एकूण संख्या आता 11 झाली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिकारी जगदीश भंडारी यांनी आज दिली. तर बच्चू खाबड यांचा मोठा मुलगा बळवंत याच्यासह एकूण सात जणांना अलीकडेच अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आज खाबड यांचा धाकटा मुलगा किरण आणि दोन सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे भंडारी यांनी सांगितले.

असा झाला घोटाळा

मनरेगा योजनेअंतर्गत योजून दिलेली कामे किंवा आवश्यक सामुग्रीची पूर्तता न करताच कंत्राट घेणाऱ्या विविध संस्थांनी सरकारकडून रक्कम वसूल करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे मंत्री बचू खाबड यांची दोन्ही मुले आणि इतरांवर आहे. या घोटाळ्यात कथितरीत्या कंत्राट घेणाऱ्या 35 एजन्सी मालकांचा समावेश असून या एजन्सी मालकांनी मनरेगांतर्गत कामे पूर्ण न करताच सरकारकडून पैसे वसूल करण्यासाठी बनावट प्रमाणपत्र आणि दस्तावेज सादर केले. तसेच 2021 ते 2024 दरम्यान सरकारी अधिकाऱ्यांसोबत संधान साधून तब्बल 71 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, देवगड बारिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री बच्चू खाबड हे सध्या पंचायत आणि कृषी मंत्री आहेत.

बळवंत आणि किरण फसवणूक करणाऱ्या एजन्सींचे मालक

भाजप मंत्री बच्चू खाबड यांची दोन्ही मुले किरण आणि बळवंत हे आदिवासीबहुल दाहोद जिह्यातील देवगड बारिया आणि धनपूर तालुक्यात मनरेगा योजनेत घोटाळा करणाऱ्या एजन्सींचे मालक आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.