
कांदिवली आणि बोरिवलीदरम्यान असलेला पोईसर नाल्यात भराव टाकल्याने त्या लगत राहणाऱया रहिवाशांच्या घरात पाणी शिरून त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन पावसाळय़ात नाल्यात पुन्हा भराव टाकू नका. हे काम पावसाळय़ानंतर करावे, अशी मागणी शिवसेनेने पश्चिम रेल्वेकडे केली आहे.
पश्चिम रेल्वेच्या बोरिवली आणि कांदिवलीदरम्यान असलेल्या पोईसर नाल्यात रेल्वेने पावसाळय़ाच्या तोंडावर भराव टाकला. या नाल्यामध्ये मातीची भरणी करण्यात आली होती. गेले दोन दिवस सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे या नाल्यातील पाणी नाल्याशेजारी राहणाऱया रहिवाशांच्या घरात शिरले. त्यामुळे रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. याची माहिती मिळताच शिवसेनेचे विभागप्रमुख अजित भंडारी, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, विधानसभा प्रमुख संतोष राणे आणि विधानसभा संघटक कृष्णा मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख संजय मांजरे यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱयांची भेट घेऊन चर्चा केली तसेच हा प्रश्न रहिवाशांच्या जिवाचा असून नाल्यात भराव टाकण्याचे काम पावसाळय़ानंतर करावे, अशी मागणी केली. त्यावर रेल्वे अधिकाऱयांनी नाल्याचे काम पावसाळय़ानंतर करण्याचे मान्य केले.