
प्रवाशाच्या अधू दृष्टीचा गैरफायदा घेत एका रिक्षाचालकाने त्याला 90 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना मुंबईत घडली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. फुरकान खान असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
वांद्रे येथील रहिवासी अमूल्य शर्मा अंधेरीत मित्रांसोबत पार्टी करायला गेला होता. अमूल्य मूळचा हरियाणाचा रहिवासी असून सध्या नोकरीनिमित्त मुंबईत राहतो. अमूल्य एका लॉ फर्ममध्ये काम करतो. अंधेरीत मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर अमूल्य वांद्रे येथील निवासस्थानी परतत होता. यासाठी त्याने अंधेरीहून वांद्रे येथे येण्यासाठी रिक्षा केली.
अमूल्यची दृष्टी कमी असल्याने चष्म्याशिवाय त्याला दिसत नाही. दुर्दैवाने पार्टीला जाता अमूल्य चष्मा लावायला विसरला अन् हेच त्याला महागात पडले. वांद्रे येथे पोहचल्यानंतर रिक्षाचालकाने त्याच्याकडे 1500 रुपये भाडे मागितले. अमूल्यने चष्मा लावला नसल्याने त्याला रिक्षाच्या भाड्याची रक्कम नीट दिसत नव्हती. तसेच जी पे वरून पैसे पाठवण्यासाठी रिक्षाचालकाचा नंबरही टाईप करता येत नव्हता. त्यामुळे त्याने रिक्षाचालकाकडे मोबाईल दिला.
अमूल्यला चष्म्याविना दिसत नसल्याचा फायदा घेत रिक्षाचालकाने जी पे वर 1500 ऐवजी 90 हजार रुपये रक्कम टाकली. त्यानंतर अमूल्यला ओटीपी विचारून तो टाकला अन् पैसे ट्रान्सफर करून घेतले. काही वेळाने अमूल्यला संशय आल्याने त्याने बँक स्टेटमेंट चेक केले असता आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर अमूल्यने पोलीस ठाणे गाठत रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.