अट्टल चोरटा सलिम कुबड्यासह दोघे गजाआड, देवनार पोलिसांची कारवाई; नऊ लाखांचा ऐवज हस्तगत

संध्याकाळचे साडेसात वाजले असताना इमारतीत कोणी नसल्याचे हेरून तिघांनी बंद घरात घुसून साडेआठ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. गुन्हा करून आरोपी शिताफीने इमारतीतून सटकले, पण देवनार पोलिसांनी तांत्रिक बाबी व खबऱ्यांच्या मार्फत शोध घेत घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून नऊ लाख 30 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

देवनारच्या गायकवाड नगरातील इमारत क्रमांक 5 मधील पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या वाघमारे हे बाजारहाट करण्यासाठी 5 एप्रिलच्या संध्याकाळी घर बंद करून गेले होते. काही वेळाने ते घरी परतले असता बंद घराच्या दरवाजाचा लॉच उचकटलेला आणि आतील कपाटातील आठ लाख 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळून आले. घरफोडी झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विजयकुमार अंबरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कैलास सोनावणे व पथकाने तपास सुरू केला.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या मदतीने तपास केला असता आरोपी हे सराईत गुन्हेगार संजय कांबळे ऊर्फ सलिम कुबड्या, नीलेश लोंढे आणि शाकिर शेख असे तिघे आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार देवनार पोलिसांनी कुबड्याला दिव्यातून, शाकिरला मानखुर्दमध्ये तर नीलेशला चुनाभट्टी येथे पकडण्यात आले. त्या तिघांकडून नऊ लाख 30 हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. समीर कुबड्याविरोधात 20 हून अधिक गुह्यांची नोंद आहे.