साताऱ्यातील 18 महसुली मंडलांत अतिवृष्टी; नद्या, नाल्यांचे पाणी शेतात घुसले, दरडी कोसळून वाहतूक ठप्प

सातारा जिल्ह्यात कधी नव्हे इतका मे महिन्यात अक्षरशः पावसाळ्यासारखा पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात आज ‘रेड अलर्ट’ दिला असला, तरी पावसाचा जोर कमी होता. तथापि, मागील 24 तासांत 18 महसुली मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. शेतशिवारात पाणी साचलेले दिसत असून, तीन घरांची पूर्णतः, तर 20 घरांची अंशतः पडझड झाली आहे. या पावसाने उन्हाळ्याला ‘पळवून’ लावले असून, हवेत कमालीचा गारवा पसरला आहे.

गेले आठवडाभर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून, आज तर हवामान विभागाने जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ दिला होता. मात्र, तसा पाऊस बरसला नाही. मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी संततधार पाऊस झाला असून, जिल्ह्यातील 18 महसुली मंडलांत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या या तडाख्यात कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अनेक घरांची पडझड झाली असून, दरडी कोसळल्यामुळे काही वाहतूक मार्ग बंद आहेत. कृष्णा, कोयना, उरमोडी, कुडाळी, वेण्णा, तारळी, उत्तर मांड यांसारख्या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, मेमध्येच नद्यांना पूर आल्याचे दिसत आहे. दुष्काळी भागासह सगळीकडेच ओढे-नालेही प्रवाहित झाले आहेत.

सातारा तालुक्यात सज्जनगडजवळील बोरणे घाटात बोरणे गावच्या हद्दीत नव्यानेच बांधकाम केलेल्या मुलाच्या भरावात विटांनी भरलेला ट्रक खचला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीमध्ये व्यत्यय निर्माण झाला होता. त्यात या ठिकाणी दरडही कोसळल्यामुळे आणखीनच अडचण निर्माण झाली होती.

सर्वसाधारणपणे एप्रिल-मे महिन्यांत वळवाचा पाऊस पडत असतो. खरीप हंगामातील पेरण्या करण्यासाठी, शेतजमिनीची मशागत करण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरत असतो. परंतु वळवाऐवजी अनपेक्षितपणे पावसाळ्यासारखाच पाऊस कोसळू लागल्यामुळे शेतकऱ्यांसह सगळेच चक्रावून गेले आहेत. पेरणीपूर्व मशागतीची कामे करायची तरी केव्हा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पहावे तिकडे शेतात पाणी साचून राहिल्यामुळे आता चांगली उघडीप मिळाल्याशिवाय ही कामे करता येणार नाहीत.

दुष्काळी भागात अतिवृष्टी
सातारा तालुक्यातील वर्ये, पाटण तालुक्यातील चाफळ, तळमावले, मारुल हवेली, कोरेगाव तालुक्यातील कुमठे, वाठार स्टेशन, किन्हई, खटाव तालुक्यातील बुध, माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर, फलटण तालुक्यातील फलटण, आसू, होळ, गिरवी, आदर्की, वाठार, बरड, राजाळे, कोळकी या महसुली मंडलात तुफान पर्जन्यवृष्टी झाली असून, यातील सातारा, पाटण तालुक्यातील मंडले वगळता संपूर्ण दुष्काळी भागात अतिवृष्टी झाली आहे.

जावलीतील एकीव धबधबा झाला प्रवाहित
जावली तालुक तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार सरी कोसळत असल्याने ओढे व नाल्यांना पाणी आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून ऐन उन्हाळ्यात एकीव धबधब्यासह छोटे-छोटे धबधबे वाहू लागले आहे. या धबधब्यांवर पर्यटक आनंद घेत आहेत. जावलीच्या दक्षिण विभागात एकीव धबधबा आहे. तीन दिवस पडत असलेल्या पावसामुळे हा धबधबा प्रवाहित झाला आहे. ऐन उन्हाळ्यात हा धबधबा फेसाळायला लागल्याने धबधबा पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. सोशल मीडियावर या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहून धबधबा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

जिल्ह्यात सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत व कंसात या हंगामात आजअखेर
तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे: सातारा 50.3(247), जावली 48.2(276.8), पाटण 59.7 (246.3), कराड 44.1 (182.1), कोरेगाव 54 (233.7), खटाव 33.2 (153.9), माण 42.1 (151.4), फलटण 75.3 (165.7), खंडाळा 34.4(156.6), वाई 41(208.8), महाबळेश्वर 34.4 (239.7).