
मुंबईत सोमवारी झालेल्या पावसात मुंबई बुडाली होती. मेट्रो रेल्वे स्थानक पाण्याखाली गेले होते. या मुंबईच्या दूरवस्थेला भाजप आणि मिंधे यांनी केलेला भ्रष्टाचारच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच त्यांनी मेट्रो कामात झालेल्या निविदा घोटाळ्यांची माहितीही दिली. तसेच ही कामे केलेल्या संबिधतांवर कारवाई करण्याची गरजही संजय राऊत यांनी केली.
श्रेयवादाच्या लढाईतून घाईघाईने कामची उद्घाटने करण्यात येतात. त्यानंतर अशी परिस्थिती ओढवते. पहिल्याच पावसात मेट्रो बुडाल्याबाबत संबंधितांचा राजीनामा घेण्याची गरज आहे. श्रेयवादासाठी घाईघाईने कामे उकरून उद्घाटने केली जातात, त्यानंतर ते कोसळले की विरोधकांवर खापर फोडून मोकळे होतात. देशात काही घडले की, पंडित जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग, इंदिरा गांधी यांची नावे घेतात. गेली 10 वर्षे ते काय हजामती करत आहेत? देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, सरंक्षण मंत्री काय करत आहेत? असा सवालही त्यांनी केला.
राज्यात कोणाची सत्ता आहे, ते काय काम करत आहेत, त्यांची फक्त खाबूगिरी सुरू आहे. त्यानंतर काही झाले की, उद्धव ठाकरे, अमूक, तमूक यांची नावे घेतात. त्यांना सत्ताधारी म्हणवून घ्यायला लाज वाटली पाहिजे, मुंबई बुडत असताना फडणवीस नांदेडमध्ये अमित शहा यांच्यासोबत राजकारण करत होते. आमच्या कार्यकाळात चुका झाल्याचा आरोप करतात मग साडेतीन वर्षे ते काय करत होते. मेट्रोचे काम कोणी केले, त्यासाठी गुजरातचे सर्व कंत्राटदार होते. आताही मुंबईतील साडेचार हजार कोटींचा कंत्राटे अहमदाबादमधील कंत्राटदारांना देण्यासाठी नियमात बदल करण्यात येत आहेत., याबाबत आपण आणखी माहिती देऊ असे ते म्हणाले. मुंबईतील सत्ता महापालिका अस्तित्त्वात नाही, याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी केला.
मुंबई मेट्रोच्या कामात त्यांनी दीड हजार कोटींचा टेंडर घोटाळा झाला आहे. या पैशांतून त्यांनी शिवसेना फोडण्याचे आणि नगरसेवक विकत घेण्याचे कारस्थान सुरू आहे. जनतेच्या पैशांतून ही सर्व लूट सुरू आहे. गेल्या चार वर्षात यांनी मुंबईची 35 हजार कोटींची लूट चालवली आहे. या भ्रष्टाचारामुळेच मुंबई बुडाली आहे, असे घणाघातही संजय राऊत यांनी केला.