अतुल चांदूरकर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी बढती, केंद्राकडून अधिसूचना जारी

मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून बढती देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजिअमने तशी शिफारस केल्यानंतर आज त्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही. अंजारिया, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विजय बिष्णोई यांनाही सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून बढती देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या तीन रिक्त पदांसाठी न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय कॉलिजिअमने घेतला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय कॉलेजियमची बैठक नुकतीच पार पडली. त्यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विजय बिष्णोई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. या शिफारसीनंतर गुरुवारी केंद्र सरकारने याबाबतची अधिसूचना जारी केली. न्यायमूर्ती चांदूरकर हे 6 एप्रिल 2030 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम पाहणार असून उद्या शुक्रवारी तीनही न्यायमूर्ती शपथ ग्रहण करणार आहेत.