नरेंदरला मी सरेंडर करायला लावले! ट्रम्प अकरा वेळा बोलले तरी मोदी गप्प का?

‘मी नरेंदर मोदी यांना सरेंडर करायला लावले, असे डोनाल्ड ट्रम्प अकरा वेळा जाहीरपणे बोलले आहेत तरीही मोदी त्यावर बोलत का नाहीत,’ असा थेट सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज बिहारमधून केला.

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम झाल्याचे दावे सातत्याने हिंदुस्थान सरकार फेटाळत आहे. दुसरीकडे ट्रम्प यांच्या दाव्याला रशियानेही दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले.

‘मी मोदींना शरण येण्यास भाग पाडले असे ट्रम्प पुनः पुन्हा सांगत असताना मोदींनी त्यावर ब्र शब्द काढलेला नाही. ट्रम्प खोटे बोलत असतील तर तसे मोदींनी जाहीरपणे देशाला सांगायला हवे, पण मोदी तसे करणार नाहीत. कारण ट्रम्प जे सांगत आहेत तेच सत्य आहे आणि मोदींना शरण जाण्याची सवयच आहे,’ अशी तोफ राहुल यांनी डागली.