
>> सुधाकर वसईकर
लहान मुलांसाठी कविता लिहिणं सोपं नसतं! त्यासाठी त्यांच्यासारखं लहान व्हावं लागतं. लहान मुलांच्या निरागस मानसिकतेचा, त्यांच्या अवखळपणाचा तळ गाठावा लागतो आणि ही किमया कविवर्य सतीश सोळांकूरकर यांना लीलया अवगत झाली आहे. अनघा प्रकाशनाने नुकताच त्यांचा ‘बल्लू मॉनिटर’ बाल कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. एकूण 34 विविध बालकवितांमधून अवखळ, खोडकर बल्लू मॉनिटरचे मजेशीर भावविश्व सहजसोप्या, खेळकर शब्दांत त्यांनी साकारले आहे. चित्रकार, सुलेखनकार नीलेश बागवे यांनी चितारलेले सुंदर मुखपृष्ठ, प्रत्येक कवितेला रेखाटलेली साजेशी चित्रे आणि अंतर्गत आकर्षक सजावट बालमनाचे लक्ष वेधणारी आहे.
बल्लू मॉनिटर, लिंबाचं झाड, बल्लूची शाळा, बल्लूचे आजारपण, बल्लोबाचे स्वप्न, प्रश्नांची साखळी, पाऊस येता येता… आदी कवितांतून बल्लूच्या एकेक बाललीला बालमनाला खिळवून ठेवणाऱया आहेत. खोडकर बल्लूची जगावेगळी खोटी शाळादेखील हटकेच आहे …आणि खऱयाखुऱया शाळेत जाताना मात्र करामतखोर बल्लूला शाळेत दांडी मारावीशी वाटते. तो सटरफटर खाऊन आजारपण ओढवून घेतो. त्यामुळे कडू औषधी, भाताची पेज यावर त्याला राहावे लागते. ‘बल्लूचे आजारपण’ ही कविता ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?’ या लोकप्रिय गीताची आठवण करून देते. ‘बल्लोबाचे स्वप्न’ कवितेतलं बल्लूचं स्वप्नविश्व तर्कसंगत नसलं तरी बहार आणणारं आहे. त्याच्या स्वप्नात हत्तीला राहायला पोपटाचा पिंजरा आणि मासे पाण्यात राहण्याऐवजी जंगलात राहायला जातात. बालमनाला पडणाऱया लहानमोठय़ा प्रश्नांची, शंकांची, भास-आभासांची कोडी सहज उकल करत कविवर्य सतीश सोळांकूरकर यांनी इतर कवितांमधून निर्व्याज, निरागस लहानपण छान टिपलंय. लहान मुलांना सगळ्यात जवळची आईच असते. तीच त्यांचं भावविश्व बनून जाते. आईशिवाय त्यांना जगात कोणीच प्यारं, पवित्र, थोर वाटत नाही याचा प्रत्यय देणाऱया ‘शाळेतल्या बाई’, ‘आई’, ‘आई जगामध्ये थोर’ आदी कवितांतून आईची थोरवी, ममत्व आणि दैवत्व कवीने छान वर्णिले आहे. लहानग्यांना शाळेतल्या बाईत आई दिसते आणि आई तर देवासमान वाटते. ‘आई’ कवितेतील समारोपाच्या ओळीत ती भावना उत्कटतेने आलीय. प्रख्यात कवी अशोक बागवे यांनी संग्रहाला सुंदर पाठराखण केली आहे. रोप, सूर्य उगवतो, माकडोबाचे दुकान, मोर, पोपट, एक दोन, तीन चार, उद्यापासून, देवबाप्पा देवबाप्पा, एकदा मला भेटशील का?… या कविता मनोरंजक तसेच वाचनीय झाल्या आहेत.
बल्लू मॉनिटर
कवी ः सतीश सोळांकूरकर प्रकाशक ः अनघा प्रकाशन
मूल्य ः रु, 110/- पृष्ठे ः 40


























































