
डिफॉल्ट मीटरमुळे पैसे न भरल्याने वीजचोरीचा ठपका ठेवत वीज पुरवठा खंडित केल्याप्रकरणी हायकोर्टात धाव घेणाऱ्या एका कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. कंपनीचा खंडित केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरू करा, असे आदेश हायकोर्टाने एमएसईडीसीएलला दिला आहे.
ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे नातू प्लॅस्टिक मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून एमएसईडीसीएलकडून वीज मीटर बदलण्यात आले त्यावेळी नादुरुस्त मीटर बसवल्याने कंपनीला कमी बिल येत असल्याचे निदर्शनास येताच एमएसईडीसीएलच्या अधिकाऱ्यांनी कंपनीवर धाड टाकली तसेच कंपनीने वीजचोरी केल्याचा ठपका ठेवत अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. याशिवाय 44 लाख 12 हजार 94 रुपये भरण्याचे आदेश कंपनीला दिले. या प्रकरणी कंपनीने अॅड. राजेश दर्वेश, अॅड. हरेक्रिष्ण मिश्रा आणि अॅड. विलास भांबर्डे यांच्या मार्फत याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली.

























































