विंडीज आणि आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात अदलाबदल

नव्या मोसमात हिंदुस्थानच्या दौऱ्यावर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे संघ येत असून त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकांच्या स्थळांमध्ये अदलाबदल करण्यात आल्याचे बीसीसीआयने आज जाहीर केले. या दौऱ्यात वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकन संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत.

आगामी मोसमात हिंदुस्थानचा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला असून त्यात कसोटीसह एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिकाही खेळविली जाणार आहे. बीसीसीआयने कसोटी सामन्यांसह ऑस्ट्रेलिया महिला आणि पुरुष अ संघाच्या दौऱ्याचाही कार्यक्रम निश्चित केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा अ संघही ‘हिंदुस्थान अ’विरुद्ध खेळण्यासाठी येणार असून या कार्यक्रमातही बदल करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

कोलकात्याची कसोटी दिल्लीला अन् दिल्लीची कोलकात्याला

येत्या 9 ऑक्टोबरपासून विंडीजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना कोलकात्याला खेळविला जाणार होता. मात्र दुबळय़ा विंडीजविरुद्धचा कसोटी सामना आयोजित करण्यात बंगाल क्रिकेट संघटनेला स्वारस्य नव्हते. त्यामुळे विंडीजविरुद्धचा हा सामना आता दिल्ली येथे खेळविला जाईल, तर 13 नोव्हेंबरपासून दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणारा कसोटी सामना कोलकात्यात खेळविला जाणार आहे. तसेच बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकन अ संघाचाही दौरा जाहीर केला असून त्यांच्या स्थळांचीही घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन महिलांचा संघ येत्या सप्टेंबर महिन्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.