
मोबाईलपासून मुलांना लांब ठेवा असं वारंवार सांगितलं जातं. परंतु मोबाईलचा अतिरेक गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. एक आणि दोन वर्षांची मुलं सर्रास फोन वापरताता आणि आई-वडिलांना सुद्धा त्याच कौतुक असतं. पण हेच मोबाईलवेड आता मुलांच्या जीवावर उठत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईलमुळे अल्पवयीन मुलांनी आपलं जीवन संपवल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशातच आता मुंबईतील आरे कॉलनीमध्ये एका 14 वर्षीय मुलीने गेम खेळायला मोबाईल दिला नाही म्हणून जीवन संपवलं आहे.
आरे कॉलनीमध्ये सोमवारी दुपारी 3.45 च्या दरम्यान घटना घडली आहे. कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय श्रद्धाला (बदलेलं नाव) मोबाईलवर गेम खेळण्याचं प्रचंड वेड होतं. सोमवारी श्रद्धाने गेम खेळण्यासाठी मोबाईल मागितला असता पालकांनी मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या श्रद्धाने घरात स्वत:ला कोंडून घेतलं आणि ओढणीने गळफास घेतला. त्यानंतर आई-वडिलांनी तिला तात्काळ जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉम रुग्णालयात दाखलं केल. मात्र रुग्णालयात भरती करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे, डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.




























































