49 चेंडूत 150 धावा, 19 षटकारांची आतषबाजी; IPL मध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूनं रोहित शर्मा, ख्रिस गेलचा विक्रम मोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये अलसोल्ड राहिलेल्या न्यूझीलंडच्या फिन अ‍ॅलन याने मेजर लीग क्रिकेट 2025 स्पर्धेत तुफानी फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. स्पर्धेतील सलामीच्याच लढतीत फिन अ‍ॅलन याने ऐतिहासिक खेळी करत ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल यांचा विक्रम मोडला आहे.

मेजर लीग क्रिकेट 2025 चा पहिला सामना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न आणि वॉशिंग्टन फ्रीडम या संघात पार पडला. या लढतीत प्रथम फलंदाजी करताना फिन अ‍ॅलनच्या विस्फोटक खेळीच्या बळावर 20 षटकात 269 धावा चोपल्या. फिन अ‍ॅलनने 51 चेंडूत 151 धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने 5 चौकार आणि 19 उत्तुंग षटकार ठोकले. या खेळीसह त्याने टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद दीडशतक ठोकण्याचा विक्रम केला.

फिन अ‍ॅलन याने अवघ्या 34 चेंडूत शतकाला गवसणी घातली. 13 चौकार आणि 3 चौकारांच्या मदतीने त्याने हा शतकी टप्पा गाठत वैभव सूर्यवंशी आणि रोहित शर्मा यांना मागे टाकले. वैभव सूर्यवंशी आणि रोहित शर्मा या दोघांच्याही नावावर टी20 क्रिकेटमध्ये 35 चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम होता. हा विक्रमही अ‍ॅलनने मोडला. तसेच ख्रिस गेल आणि निकोलस पूरन यांनाही धोबीपछाड दिला.

टी20 क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक षटकात मारण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर होता. 2017 मध्ये गेलने एका डावात 18 षटकार ठोकले होते, तर एस्टोनियाच्या साहिल चौहान याने 2024 मध्ये या विक्रमाची बरोबरी केली होती. हा विक्रम आता अ‍ॅलनने मोडला आहे.

मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम निकोलस पूरन याच्या नावावर होता, त्याने 40 चेंडूत हा कारनामा केला होता. हा विक्रमही अ‍ॅलन याने आता आपल्या नावावर केला. अ‍ॅलनच्या खेळीच्या बळावर सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न संघाने धावांचा डोंगर उभारला आणि वॉशिंग्टन फ्रीडम संघाला 146 धावांमध्ये रोखत 123 धावांनी मोठा विजय मिळवला.