
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 5 विकेटने हरवून इतिहास रचला आहे. 27 वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर दक्षिण आफ्रिकेने ICC ट्रॉफी उंचावली आहे. कर्णधार टेम्बा बवुमाच्या नेतृत्वात इंग्लंडच लॉर्ड्स मैदान दक्षिण आफ्रिकेने गाजवलं. याचसोबत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने 282 धावांच आव्हान दिलं होतं. आतापर्यंतच्या ICC फायनलच्या इतिहासात एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण कोणत्याच संघाला जमलं नव्हतं. परंतु दक्षिण आफ्रिकेने 5 गड्यांच्या मोबदल्यात आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आणि जगज्जेतेपद पटकावलं. ICC च्या सर्व फॉरमेटमधील फायनलच्या सामन्यांचा विचार केला तर दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंतच्या सर्वाधिक 282 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. यापूर्वी 2011 च्या वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 275 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत जेतेपद पटकावले होते. तेव्हापासून हा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होता. परंतु आता ICC फायनलमध्ये सर्वाधिक धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेने आपल्या नावावर केला आहे.




























































