
>>विठ्ठल देवकाते
आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड देत टेम्बा बवुमा हा क्रिकेटर केवळ दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा पहिला कृष्णवर्णीय कर्णधारच बनला नाही, तर आपल्या संघाचा जेतेपदाचा दुष्काळ संपविणारा यशस्वी कर्णधार होण्याचे भाग्यही त्याला लाभले. ज्या देशात वर्णभेद अजूनही खोलवर रुजलेला असताना एका झोपडपट्टीतून येत दक्षिण आफ्रिकेला कसोटीचा जगज्जेता बनविण्यापर्यंतचा या छोटय़ा चनीच्या क्रिकेटपटूचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखाच थक्क करणारा आहे. दक्षिण आफ्रिकेचे हे जगज्जेतेपद केवळ क्रिकेटमधील यश नाहीये, तर टेम्बा बवुमाच्या संघर्षाची, त्याच्या जिद्दीची आणि स्वप्नपूर्तीसाठी झगडण्याची थरारक सत्य कहाणी होय.
टेम्बा बवुमाचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनजवळील लांगा या झोपडपट्टीत झाला. ही झोपडपट्टी म्हणजे जिथे दिवसाला दोन वेळचे अन्न मिळणेही मोठे मुश्कील होते. समाजात वर्णभेद अजूनही खोलवर रुजलेला होता. अशा प्रतिकूल वातावरणात एका कृष्णवर्णीय कुटुंबातील मुलाने ‘क्रिकेटपटू’ बनायचे स्वप्न बघणेसुद्धा एकप्रकारे गुन्हाच होता. मात्र शाळेच्या मैदानात खेळताना शिक्षकांच्या मुरब्बी नजरेने टेम्बा बवुमाचे काwशल्य हेरले अन् तेव्हापासून टेम्बाच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली.
नेल्सन मंडेला राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी ‘अपार्थाइड’ व्यवस्थेचा शेवट झाला त्याला आता तीन दशके झाली तरी आजही ‘वर्ण’ हा घटक दक्षिण आफ्रिकेतील सामाजिक आणि क्रीडा जीवनात खोलवर रुजलेला आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाने गेल्या काही दशकांत खेळांमध्ये ‘वर्णसाम्य’ साधण्याचा प्रयत्न केला. विशेषतः क्रिकेट आणि रग्बी या पारंपरिकपणे गोऱ्यांच्या वर्चस्वातील खेळांमध्ये. मात्र या धोरणाला कायम टीका झेलावी लागली. अनेक वेळा हा विषय नकारात्मक कारणांनीच चर्चेत राहिला. हाशिम आमला आणि पॅगिसो रबाडा यांसारख्या काही खेळाडूंनी झपाटय़ाने आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले. मात्र काही कृष्णवर्णीय आफ्रिकन खेळाडूंना कोटा (राखीव) पद्धतीतील खेळाडू म्हणूनच हिणवले गेले. त्यामुळे हा संघर्ष टेम्बा बवुमाच्याही वाटय़ाला आला. ‘तो बुटका आहे’, ‘तो कृष्णवर्णीय आहे’, ‘तो टिकणार नाही’ अशा टीकांना त्याला सामोरं जावं लागलं. मात्र एक फलंदाज म्हणून, एक क्षेत्ररक्षक म्हणून आणि नंतर कर्णधार म्हणूनही टेम्बा प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देत गेला. दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी शतक झळकावणारा तो पहिला कृष्णवर्णीय आफ्रिकन क्रिकेटपटू होता आणि संघाचे नेतृत्व करणाराही तो पहिला कृष्णवर्णीय होता. दक्षिण आफ्रिकेने 20 व्या शतकाच्या सुरुवातीपासून कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, मात्र शतकभरात त्यांनी कृष्णवर्णीय कर्णधार दिला नव्हता. अश्वेल प्रिन्स हा 2006 मध्ये पहिला अश्वेत कर्णधार ठरला होता, पण तोही तात्पुरता. त्यामुळे टेम्बा बवुमा कसोटी संघाचा कर्णधार होणे हा केवळ वैयक्तिक विक्रम नव्हता, तर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासातील एक नवीन सोनेरी पान होते. टेम्बा बवुमाने शनिवारी जेव्हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये विजय मिळवून ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर जगज्जेतेपदाची मानाची गदा उचलली अन् ‘गनशॉट’ सेलिब्रेशन करत मैदानभर आनंद साजरा केला तेव्हा लाखो लोकांच्या अश्रूंचा बांध फुटला अन् त्यांना हुंदके अनावर झाले. कारण त्यांनी नरकसदृश झोपडपट्टीतील एक मुलगा काटेरी वाटेवरून चालत चालत जगाच्या अत्युच्च व्यासपीठावर पोहोचलेला बघितला होता.
अजेय कर्णधार
टेम्बा बवुमा हा एक चांगला कसोटी फलंदाज आहे, हे त्याने कधीच सिद्ध केलं आहे. मात्र तो केवळ दक्षिण आफ्रिकेचा पहिला कृष्णवर्णीय कसोटी कर्णधार नाही, तर त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ अद्याप एकही कसोटी सामना हरलेला नाही, हे विशेष. बवुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने 10 पैकी 9 कसोटी सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.
टेम्बा म्हणजे आशा!
टेम्बा बवुमाचं टेम्बा हे नाव त्याच्या आजीनं ठेवलं. टेम्बा याचा अर्थ आफ्रिकन भाषेत ‘आशा’ असा होतो. बवुमानं आपलं टेम्बा हे नाव खऱ्या अर्थाने सार्थक केलं. कारण तो आपल्या दुर्लक्षित, कुपोषित समाजाची आशा ठरला. एवढंच नव्हे तर तो देशाचीही आशा ठरला. त्याचं नाव टेम्बा, तेंबा, तेम्बा, टेंबा असं कसंही लिहिलं जात असलं तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू यशस्वी कर्णधार म्हणून टेंभा मिरवतोय एवढं नक्की. तुम्हालाही जगातील सर्वोत्तम गोष्टी मिळवायच्या असतील तर तुमच्याकडेही टेम्बा बवुमासारखी हीच आशा असली पाहिजे.