
दत्तक मुलाचे नाव बदलण्यास उच्च न्यायालयाने एका जोडप्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे अझर आता कार्तिकेय होणार आहे. या बाळाला त्याचे पालक दत्तक प्रक्रियेसाठी मुंबईतील एका आश्रमशाळेत देऊन गेले. एका जोडप्याने या बाळाला दत्तक घेतले आहे. नियमानुसार सर्व कागदोपत्री नोंद केल्यानंतर न्यायालयाच्या अंतिम परवानगीसाठी या जोडप्याने अर्ज केला होता. न्या. रियाज छागला यांच्या एकल पीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला. बाळाचे आईवडील म्हणून या जोडप्याच्या नावाची नोंद महापालिकेने जन्म नोंदणी प्रमाणपत्रावर करावी. त्याच्या नावात अझरऐवजी कार्तिकेय असा बदल करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. हे जोडपे बंगळुरूचे आहे. त्यांच्या विवाहाला 14 वर्षे झाली, पण त्यांना अपत्य झाले नाही. आई-बाबा होण्यासाठी अखेर त्यांनी बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी जन्मलेल्या या बाळाला दत्तक घेऊन हे जोडपे आई-बाबा झाले आहेत.