
दिल्ली येथील साईभक्तांची शिर्डीत चारमजली इमारतीच्या खरेदी व्यवहारात 51 लाखांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शिर्डी पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 51 लाखांची फसवणूक करणाऱया जागामालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विजय छगनराव कुमावत (रा. शिर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. दिल्लीतील साईभक्त मनोजकुमार जैन आणि राजेंद्रकुमार जैन यांनी शिर्डी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
शिर्डी परिसरात राहणाऱया कुमावत याला त्याच्या चारमजली इमारतीची विक्री करायची आहे, अशी माहिती खरेदी-विक्री करणारे खंडू गोर्डे नावाच्या व्यक्तीला दिली होती. त्याच्या मध्यस्थीने दिल्ली येथील एका साईभक्ताने ही इमारत खरेदी करण्यासाठी एक कोटी 11 लाख रुपयांत व्यवहार करून इमारत विकत घेण्यासाठी 51 लाख रुपये इसार रक्कम म्हणून दिले होते. मात्र, खरेदीखत करून देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने दिल्ली येथील साईभक्त मनोजकुमार आणि राजेंद्रकुमार यांनी शिर्डी पोलिसांत फिर्याद दिली. त्यामुळे शिर्डी पोलिसांनी आरोपी विजय छगनराव कुमावत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
मनोजकुमार आणि राजेंद्रकुमार जैन हे साईभक्त आहेत. त्यांना शिर्डी येथे मिळकत अपेक्षित असल्याने खंडू गोर्डे यांच्या माध्यमातून हा व्यवहार केला गेला. हा व्यवहार एक कोटी 11 लाख रुपयांत ठरलेला होता. 1 जुलै 2024 रोजी नोटरीदेखील करण्यात आली होती. त्यापोटी 81 हजार व 95 हजार रुपये ऑनलाइन आणि 75 हजार फोनपेवरून असे दोन लाख 51 हजार रुपये दिले. राहिलेली रक्कम खरेदीखतावेळी दिल्यानंतर घराचा ताबा देण्याचेदेखील ठरले होते.
‘विजय छगनराव कुमावत यांनी वेळोवेळी अनेक कारणे देऊन, ‘पैसे दिले नाहीत तर तुमचा इसार बुडेल, तसेच नोटरीदेखील रद्द होईल,’ असे सांगितले. त्यामुळे 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधी अखेर फोनपे, गुगल पे, बँक अकाऊंटमार्फत 51 लाख रुपये दिल्यानंतरही संबंधित इमारत व जागेचे खरेदीखत विजय कुमावत करून देत नाहीत.
याबाबत मध्यस्थ खंडू गोर्डे यांना विचारले असता, त्याने हा इसम फसवणूक करणारा आहे, असे मला फोनवर सांगितले. त्यानंतर संबंधित इमारत व जागेबाबत मी माहिती काढली असता, त्या इमारतीवर कुमावत यांच्या पत्नीच्या नावे 45 लाख रुपये कर्ज असून, इमारतीवर बोजा असल्याचे समजल्याने वेळोवेळी पैशांची मागणी केली. खरेदीखत करून देण्यास नकार दिल्याने विजय छगनराव कुमावत यांनी 51 लाख रुपयांची फसवणूक केली आहे,’ अशी फिर्याद मनोजकुमार व राजेंद्रकुमार जैन यांनी पोलिसांत दिली.
यापूर्वीही केली होती फसवणूक
फसवणुकीतील आरोपी विजय छगनराव कुमावत याने शिर्डी शहरातील काहींची याच इमारतीच्या माध्यमातून आाrर्थक फसवणूक केल्याचा प्रकार यापूर्वी घडला होता. त्यात काहींना लाखो रुपयांचा फटका बसला होता. ती मंडळीदेखील आता विजय कुमावत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. या गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे करीत आहेत.