
इस्रायल आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मंगळवारी सलग पाचव्या दिवशी दोन्ही देशांनी हल्ले-प्रतिहल्ले सुरू ठेवले. इराणने इस्रायलला प्रत्युत्तर देताना तेल अवीवमधील मोसादच्या मुख्यालयावर हवाई हल्ला केला. तसेच अमान या लष्करी गुप्तचर संस्थेच्या इमारतीला टार्गेट करतानाच इराणने इस्रायलच्या दिशेने अनेक क्षेपणास्त्रे डागली. लागोपाठच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 24 जणांचा मृत्यू व 600 हून अधिक जण जखमी झाले. तर इराणमध्ये आतापर्यंत 224 ठार तसेच 1481 जण जखमी झाले आहेत. गेल्या आठवडय़ात इस्रायलने सलग हवाई हल्ले करून इराणला हादरवून सोडले. त्यावर सुरुवातीला शांत राहिलेल्या इराणने जोरदार हल्ले सुरू केले आहेत. मंगळवारी सलग दुसऱया दिवशी इराणने इस्रायलच्या गुप्तचर संस्थेला टार्गेट
करतानाच विविध शहरांतील महत्त्वाच्या
ठिकाणी क्षेपणास्रे डागली. प्रत्युत्तरादाखल हल्ल्यादरम्यान इस्रायलवर 370 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि शेकडो ड्रोन डागण्यात आल्याचे इराणी सैन्याने जाहीर केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी-7 शिखर परिषदेतून बाहेर पडल्यानंतर इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदीसंबंधी विधान केले होते. ट्रम्प यांचे ते विधानही आपण गंभीर घेतल्याचे इराणने स्पष्ट केले.
संघर्ष थांबवण्याचे 20 देशांचे आवाहन
इजिप्त आणि जॉर्डनसह 20 देशांनी इस्रायल-इराण संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले आहे. या देशांनी संयुक्त निवेदनात इस्रायलच्या इराणविरुद्धच्या आक्रमकतेमुळे आखातातील वाढत्या तणावाचा निषेध केला व शांततेसाठी चर्चेचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले.
तेहरानमध्ये दुकाने बंद, पेट्रोलसाठी रांगा
युद्धजन्य स्थितीमुळे इराणमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राजधानी तेहरानमध्ये दुकाने बंद केली जात असून पेट्रोलसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मंगळवारी सकाळपासून तेहरानचा मुख्य भाग रिकामा झाला आणि अनेक दुकाने बंद करण्यात आली. शहरातील प्राचीन ‘ग्रँड बाजार’ देखील बंद केला. यापूर्वी फक्त सरकारविरोधी निदर्शनांच्या वेळी किंवा कोरोना महामारीत ही परिस्थिती उद्भवली होती.
जी- 7 देशांचा इस्रायलला पाठिंबा
जी- 7 परिषदेसाठी अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, जपान, इटली, कॅनडा या सात देशांचे प्रमुख नेते कॅनडात एकत्र आळे असून जी-7 गटाने आज इस्रायलला पाठिंबा दर्शविला. त्याचवेळी इराण आखातातील अस्थिरतेचे कारण असल्याचे नमूद केले आहे.
ट्रम्प अमेरिकेला परतले
डोनाल्ड ट्रम्प जी-7 शिखर परिषद सोडून आज तातडीने अमेरिकेत परतले. आखातातील तणावामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले. मी युद्धबंदीसाठी वॉशिंग्टनला परतत नाही. हा विषय त्यापेक्षा खूप मोठा आहे, असे सूचक विधान ट्रम्प यांनी केले.
- इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे उपकमांडर मेजर जनरल अली शादमानी यांचा मृत्यू झाला. शादमानी हे इराणच्या खातम-अल-अंबिया मुख्यालयाचे म्हणजेच लष्करी आपत्कालीन कमांडचे प्रमुख होते. चार दिवसांपूर्वीच त्यांनी सूत्रे स्वीकारली होती.
युद्धात ट्रम्प यांची उडी, खोमेनी यांना शरण येण्यास सांगितले!
इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेने अखेर उडी घेतली आहे. आता इराणच्या आकाशावर आमचे पूर्ण नियंत्रण आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला. इराणचे सर्वोच्च नेते कुठे लपले आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. त्यांच्यापर्यंत पोहचणे सोपं आहे, पण आम्ही त्यांना मारणार नाही. त्यांनी बिनशर्त आत्मसमर्पण करावे, अशी धमकीच ट्रम्प यांनी अयातुल्ला खोमेनी यांचे नाव न घेता दिली. तर सद्दाम हुसेनसारखी खोमेनींची अवस्था करू, अशी धमकी इस्रायलने दिली.
तेहरान सोडून जाण्यासाठी पळापळ
तेहरान सोडण्यासाठी लोकांची पळापळ सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कॅनडा येथील जी-7 शिखर परिषदेच्या मध्यातूनच अमेरिकेत माघारी परतले. त्यांनी आपल्या नागरिकांना ताबडतोब तेहरान सोडण्याचा इशारा दिला आहे. चीननेही आपल्या नागरिकांना देश सोडण्यास सांगितले.
हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची तेहरानमधून सुटका
दहा हजार हिंदुस्थानी नागरिक इराणमध्ये अडकले आहेत. दूतावास सक्रिय झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तेहरानमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना दूतावासाने व्यवस्थेनुसार शहरातून सुरक्षितपणे बाहेर काढल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. काही नागरिकांना आर्मेनियाच्या सीमेवरून इराण सोडण्यास मदत करण्यात आली.





























































