इंडिगो अजाईलच्या तुटपुंज्या पगारवाढीविरोधात शिवसेना-‘मनसे’चे जोरदार आंदोलन! प्रादेशिक कामगार भवनावर धडक

इंडिगो कंपनीअंतर्गत असणाऱया अजाईल कंपनीने कर्मचाऱयांना दिलेल्या तुटपुंज्या पगारवाढीविरोधात आज भारतीय कामगार सेना आणि ‘मनसे’प्रणीत हवाई कर्मचारी सेनेने एकत्र येत प्रादेशिक कामगार भवनावर जोरदार धडक दिली. चुनाभट्टीच्या श्रम रक्षा भवनाजवळ हे आंदोलन करण्यात आले.

अजाईल पंपनीने सरकारच्या दबावाखाली कर्मचाऱयांना पगारवाढ देताना महत्त्वाच्या संघटनांना विश्वासात घेतले नाही. तर नुकत्याच स्थापन झालेल्या भाजपप्रणीत एबीकेके या नव्या संघटनेसोबत तुटपुंज्या पगार वाढीचा करार केला. विशेष म्हणजे कर्मचाऱयांना केवळ दीड ते दोन हजारांचीच वाढ देण्यात आल्याचे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. याप्रसंगी संयुक्त सरचिटणीस संजय कदम, चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, मयूर वनकर, राजा ठाणगे, गोविंद राणे, दिलीप भट, सहचिटणीस निलेश ठाणगे, जगदीश निकम, विजय शिर्पे, संजीव राऊत, दिनेश परब, सुजित कारेकर, संतोष पवार, रोहीत वरवडकर आणि ‘मनसे’चेसंतोष धुरी, संतोष कदम, दीपक गायकवाड यांच्यासह ‘मनसे’ कार्यकर्ते उपस्थित होते.

सरसकट चार हजारांची वाढ द्या!

खरे तर व्यवस्थापन आणि दोन युनियन यांच्यामध्ये सामंजस्य करार सहाय्यक आयुक्तांच्या स्वाक्षरीने करण्यात आला आहे. त्यामध्ये सरसकट चार हजार रुपयांची पगारवाढ देण्याची मागणी व्यवस्थापनाने मान्य केली. यासाठी भारतीय कामगार सेनेने सातत्याने पाठपुरावा केल्याचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी सांगितले. याबाबत 25 जुलै रोजी पुन्हा पुढील बैठक होणार आहे. यावेळी जर व्यवस्थापन सक्षम अधिकाऱयांसह उपस्थित राहिले नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराच खासदार अरविंद सावंत यांनी दिला.