
पश्चिम रेल्वेवर विरार लेडीज स्पेशल लोकलमध्ये ‘लाडक्या बहिणीं’मध्ये झालेल्या रक्तरंजित घमासानाची घटना ताजी असतानाच रविवारी मध्य रेल्वेच्या जनरल डब्यात तरुण प्रवाशांमध्ये तुफान राडा झाला. धक्का लागल्याच्या वादातून तरुण भिडले आणि त्यांनी अर्वाच्च शिवीगाळ, तुंबळ हाणामारी करीत एकमेकांचे शर्ट फाडले. सीएसएमटी-कर्जत लोकलमध्ये हा प्रकार घडला.
मध्य रेल्वेवर दर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. या ब्लॉक काळात लोकलचे वेळापत्रक कोलमडते आणि ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. या गर्दीत रेटारेटी, धक्काबुक्कीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. रविवारी धक्का लागल्याच्या कारणावरुनच तरुणांमध्ये वादाला तोंड फुटले. काही क्षणांत तुंबळ हाणामारी सुरु होऊन एकमेकांना खेचण्याचा, ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. सीएसएमटीहून कर्जतला चाललेल्या लोकलमध्ये घाटकोपर आणि मुलूंडदरम्यान हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे. लोकल ट्रेनला होणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांना अपघातात प्राण गमवावा लागत आहे. त्यात आता गर्दीमुळे प्रवाशांचा संयम सुटून धावत्या लोकलमध्ये हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत.
सहप्रवाशांनी दिला चोप, सिग्नलवर उतरवले!
धावत्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी सुरु ठेवण्यात आली होती. त्यांचा धक्का लागून इतर प्रवासी खाली पडण्याची भिती निर्माण झाली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या सहप्रवाशांनी डब्यात हाणामारी करणाऱ्या तरुणांच्या टोळक्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर पुढील सिग्नलवर लोकल थांबताच त्या तरुणांना लोकलमधून खाली उतरवले. प्रशासनाने लोकलमधील गर्दी नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना राबवल्या नाही, तर हाणामारींमध्येही बळी जाण्याच्या घटना घडतील, अशी भिती प्रवासी संघटना व्यक्त करीत आहेत.