
तळोजा येथील कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजला नॅक समितीने बी प्लस मानांकन देऊन गौरवण्यात आले आहे. महाविद्यालयातील अभ्यासक्रमाचे पैलू, शैक्षणिक वातावरण, भौतिक सुविधा, राबवलेले उपक्रम, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आदींचे मूल्यमापन केले. त्याचा अहवाल नॅकच्या कार्यकारी समितीला सादर केला. त्यानंतर लॉ कॉलेजला बी प्लस मानांकन देण्याचा निर्णय घेतला. यामुळे पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज हे 2016 पासून विद्यार्थ्यांना लॉ चे शिक्षण देत आहे. नॅक समितीने मूल्यांकन प्रक्रियेत शिक्षण पद्धती, संशोधन, विकास, विद्यार्थी कल्याण, शैक्षणिक, साधनसंपत्ती आदी सामाजिक उपक्रमांचा बारकाईने अभ्यास केला. या मूल्यमापनामध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदने कॉलेजला २.५२ सी.जी.पी.ए. सह ‘बी प्लस’ हे मानांकन प्रदान करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजने बी प्लस दर्जा प्राप्त करून एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा, शिक्षणाचा दर्जा आणखी उंचवणार
बी प्लस दर्जा हे महाविद्यालयाचे कौशल्य आणि शिक्षक-विद्यार्थी यांच्या सहकार्याची पावती आहे. आगामी काळात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे देऊ शकतो याकडे आम्ही आता लक्ष देणार आहोत, असे कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे चेअरमन व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते बबन पाटील यांनी सांगितले.