
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गुरप्रीत सिंह ऊर्फ गोपी फौजी आणि साहिल मसीह ऊर्फ शाली अशी आरोपींची नावं आहे. या प्रकरणात आयएसआय एजंट राणा जावेदचाही उल्लेख करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, त्यांच्यावर आयएसआय शी संबंधित हेरगिरीच्या कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे.
गुरप्रीत 2016 पासून हिंदुस्थानी सैन्यात कार्यरत आहे आणि तो पाकिस्तानच्या आयएसआय एजंट राणा जावेदच्या संपर्कात होता. गुरप्रीतने भारतीय सैन्याच्या हालचालीसारखी गोपनीय माहिती आयएसआय ला देत होता. प्राथमिक तपासात असेही निष्पन्न झाले आहे की गुरप्रीत पेन ड्राइव्हच्या माध्यमातून अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती शेअर करत होता.
या प्रकरणात आयएसआय चा राणा जावेदचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. हेरगिरीसाठी वापरले गेलेले दोन मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की अमृतसर ग्रामीण पोलिसांनी आयएसआयशी संबंधित हेरगिरी प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे. दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी पाकिस्तानला नेमकी कोणती माहिती दिली, आणि या हेरगिरी रॅकेटमध्ये आणखी किती लोक सामील आहेत, याचा तपास सुरू आहे.




























































