
मुंबई शहर आणि उपनगरांतील उड्डाणपुलांच्या रखडलेल्या कामांना पालिकेकडून गती देण्यात येणार आहे. त्यानुसार बहुप्रतीक्षित शीव उड्डाणपूल वर्षभराने म्हणजेच 31 मे 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. तसेच मुंबई सेंट्रल येथील बेलासिस उड्डाणपुलाच्या कामासाठी 15 डिसेंबरची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे.
शीवच्या पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा शीव उड्डाणपूल तसेच ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. उड्डाणपुलांचे काम रखडल्यामुळे वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी शीव आणि बेलासिस या दोन्ही उड्डाणपुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना दिले. उड्डाणपुलांची कामे वेगाने आणि योग्य नियोजन करा. वेळीच कामे पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा सूचनाही बांगर यांनी केल्या. त्यांनी दोन्ही उड्डाणपुलांच्या कामांची पाहणी केल्यानंतर आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयात बैठक घेतली होती.
पुलाच्या कामाचे नियोजन
शीव उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूकडील पादचारी पुलाचे काम रेल्वेमार्फत 31 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण केले जाईल.
त्यानंतर मुख्य पुलाच्या दक्षिणेकडील भागाच्या तोडकामाला सुरुवात केली जाईल.
याचदरम्यान पुलाखालील जुन्या पुलाच्या भिंतीचे तोडकाम सुरू केले जाईल. जानेवारीपर्यंत गर्डर बसवण्यात येतील.
पश्चिमेकडील पोहोच मार्ग अधिक महत्त्वाचा आहे. त्याचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल.
1 ऑक्टोबर 2025 पासून दुसऱया भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येईल.
वाहतूककोंडीचा मनस्ताप
100 हून अधिक वर्षे जुन्या शीव उड्डाणपुलावरुन मोठय़ा प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरु असायची. आयुर्मान संपलेल्या या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम महापालिकेने हाती घेतले. यासोबतच बेलासिस आणि कर्नाक पुलाचेही बांधकाम केले जात आहे. एकाचवेळी तीन पुलांचे काम सुरु असल्याने त्याचा शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शीव उड्डाणपुलासाठी मे 2026 ची नवी डेडलाईन निश्चित केल्याने मुंबईकरांना आणखी वर्षभर वाहतूककाsंडीचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
बेलासिस उड्डाणपूल याच वर्षी पूर्ण होणार
बेलासिस पुलाच्या प्रकल्पासाठी यापूर्वी एप्रिल 2026 ची डेडलाईन निश्चित केली होती. मात्र त्या नियोजित कालावधीपूर्वीच डिसेंबर 2025 अखेरपर्यंत पूल वाहतुकीस खुला करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.
पुलाच्या प्रकल्पात अडथळा ठरणारी 13 बांधकामे हटवून तेथील रहिवाशांना पर्यायी घरांचे वाटप करण्यात आले आहे.
हा पूल उभारण्यासाठी 12 गर्डर टाकण्यात येणार आहेत. 15 डिसेंबर 2025 पर्यंत पुलाचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.