
मुलुंडच्या आयईएस शाळेकडून पालकांची लूट सुरू आहे. अचानकपणे पाचवीच्या प्रवेशाकरिता व्याजमुक्त ठेवी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकण्यात येत होता. पालकांच्या तक्रारीनंतर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने दादर येथील मुख्यालयात जाऊन शाळेच्या व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यानंतर या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन व्यवनस्थापनाकडून देण्यात आले. त्यामुळे पालकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.
मुलुंड येथील आयईएस शाळेच्या विद्यार्थ्यांकडून अचानकपणे पाचवीच्या प्रवेशाकरिता व्याजमुक्त ठेवी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकण्यात येत होता. यासंदर्भात पालकांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे तक्रारी केल्या होत्या. शिवसेना नेते – खासदार आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाची दादर येथील मुख्य कार्यालयात भेट घेतली. पालकांकडून ज्युनिअर केजीच्या प्रवेशा वेळी डेव्हलपमेंट फंड म्हणून याआधी रक्कम घेण्यात आली आहे. तरीही पुन्हा पाचवीच्या प्रवेशासाठी व्याजमुक्त ठेवी वसूल करणे चुकीचे आहे, असे शिष्टमंडळाने या बैठकीत निदर्शनास आणून दिले.
सकारात्मक तोडगा काढू
ग्राहक संरक्षण कक्षाने दिलेल्या निवेदनावर त्वरित विश्वस्त मंडळाची बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढू व पालकांची कोणत्याही प्रकारे लूट होणार नाही, असे आश्वासन इंडियन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सतीश लोटलीकर, सतीश नायक व सामंत यांनी दिले. या वेळी शिष्टमंडळात कक्षाचे खजिनदार देविदास माडये, कक्ष कार्यालय चिटणीस प्रशांत पाताडे, राजेश चव्हाण, प्रसारक सतीश नाटेकर, उपसंघटक विजय पवार, समीर मालणकर, हितेश जाधव, प्रभाकर बोलम, अनंत सावंत तसेच पालकदेखील उपस्थित होते.